जळगावात मनपा निवडणूक मुलाखतीच्यावेळी सोनवणे गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:51 PM2018-07-04T12:51:53+5:302018-07-04T12:53:24+5:30

भाजपा कार्यालयासमोर वाद

At the time of the Manappa election meeting in Jalgaon, the Sonawna group came in | जळगावात मनपा निवडणूक मुलाखतीच्यावेळी सोनवणे गट भिडले

जळगावात मनपा निवडणूक मुलाखतीच्यावेळी सोनवणे गट भिडले

Next
ठळक मुद्देकैलास सोनवणे व पंकज सोनवणेंविरुध्द तक्रारपूर्ववैमनस्यातून

जळगाव : प्रशांत सोनवणे खून खटल्यापासून एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले माजी नगरसेवक कैलास सोनवणे व प्रशांत याचा भाऊ पंकज सोनवणे यांच्यातील वाद सहा वर्षानंतर मंगळवारी उफाळून आला. मनपा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच भाजप कार्यालयासमोर सोनवणे गट एकमेकात भिडले. पंकज याने थेट कैलास सानेवणे यांच्यावर हल्ला केला. यात माजी नगरसेवक किशोर चौधरी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. ‘मविप्र’तील दंगलीनंतर सोनवणे गटात वाद झाला. या घटनेमुळे मनपा निवडणुकीला गालबोट लागले व शहरात प्रचंड खळबळ उडाली.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १ वाजेपासून भाजपा कार्यालयात मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतींना भाजपातर्फे सुरुवात झाली. त्यामुळे सकाळपासून इच्छुक व त्यांच्या समर्थकांची बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. दुपारी १.३० वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे कार्यालयात पोहचल्यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे देखील त्यांच्या सोबतच आले. मात्र, ते कार्यालयात न जाता कार्यालयासमोर असलेल्या एका चहाच्या दुकानासमोर भाजपाच्या काही पदाधिकारी व कार्याकर्त्यांसमवेत गप्पा करीत बसले.
पंकज सोनवणे सकाळपासून भाजपा कार्यालयात
इच्छुकांच्या मुलाखती सुरु असल्याने अनेक इच्छुक आपल्या समर्थकांसह भाजपा कार्यालयात दाखल झाले होते. पंकज सोनवणेसुद्धा सकाळी ११ वाजेपासून भाजपा कार्यालयात इच्छुकांसोबत आलेला होता. काही वेळाने पंकज हा देखील कैलास सोनवणे बसलेल्या जागी आला. तेथे आबा बाविस्कर व पंकज यांच्यात शाब्दीक वाद झाला.
शाब्दिक चकमकीनंतर हाणामारीला सुरुवात
या वादात कैलास सोनवणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पंकज याने मध्यस्थी न करण्याचा सल्ला दिल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाला. त्यानंतर शिवीगाळ होवून शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पंकज यांनी आपल्या हातात असलेला काचेचा ग्लास सोनवणे यांच्या खांद्यावर मारुन फेकला. त्यानंतर शेजारच्या आईस्क्रीमच्या गाडीवरील दोन काचेच्या बाटल्याही सोनवणे यांच्या अंगावर फोडल्या.
मध्यस्थी करणारे चौधरीही जखमी
हाणामारी सुरु झाल्यानंतर अशोक लाडवंजारी, डॉ. आश्विन सोनवणे व किशोर चौधरी यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये किशोर चौधरी यांच्या हाताला काचेचे तुकडे लागल्याने जखम झाली. पाच मिनीटातच अनेकांनी मध्यस्थी करुन हा वाद शांत करत पंकज सोनवणे याला या ठिकाणावरुन बाहेर काढले.
पदाधिकाऱ्यांची धावपळ व गोंधळ
अचानक हा वाद झाल्यामुळे भाजपा कार्यालयात आलेल्या इच्छुकांसह सर्व पदाधिकारीही कार्यालयाच्या बाहेर आले. पळापळ सुरु झाल्यामुळे भाजपा कार्यालयातही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. इकीकडे कार्यालयात गिरीश महाजन इच्छुकांच्या मुलाखती घेत होते तर दुसरीकडे बाहेर हे वादंग सुरु होते. ऐन निवडणुकीच्या काळात हा वाद झाल्याने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सहा वर्षानंतर उफाळला वाद
प्रशांत सोनवणे यांच्या खूनाच्या घटनेपासून वैर
कैलास सोनवणे व पंकज सोनवणे यांच्यात जुना वाद आहे. पंकज सोनवणे याचा भाऊ प्रशांत सोनवणे हा ७ जुलै २०१२ रोजी घरातून अचानक गायब झाला होता. त्याच्या दुसºया दिवशी कडगाव शिवारात त्याचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. कैलास सोनवणे व त्यांच्या परिवाराने प्रशांत याचा खूून केला असा आरोप त्याची आई राधाबाई सोनवणे यांनी केल्याने सोनवणे परिवारावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यात त्यांना अटकही झाली होती. काही महिन्यापूर्वी या खून खटल्याचा निकाल लागला. त्यात न्यायालयाने पुराव्याअभावी सोनवणे परिवाराची निर्दोष मुक्तता केली. या निकालाला राधाबाई सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.
बहिणीला मारहाणीच्या गुन्ह्यात शिक्षा
पंकज याची बहिण वैशाली इंगळे हिला कैलास सोनवणे व परिवाराने मारहाण केली होती. या गुन्ह्यात सोनवणे परिवारातील काही जणांना सहा महिन्याची शिक्षा झाली होती. शिक्षा व भावाचा खून या दोन कारणामुळे कैलास सोनवणे व पंकज सोनवणे यांच्यात टोकाचे वैर असल्याची माहिती मिळाली.
कोण आहे किशोर चौधरी?
किशोर भाऊलाल चौधरी हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये ते मनपात भाजपाचे नगरसेवक होते. त्यांचा जोशी पेठेत प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये चौधरी यांचे निवासस्थान आहे. मनपा निवडणुकीत फेरबदल झाल्याने आता प्रभाग २२ चे प्रभाग ४ मध्ये रुपांतर झालेले आहे. कैलास सोनवणे यांचे ते जवळचे मित्र आहेत.
तू वॉर्डात कसा उभा राहतो म्हणत काचेचा ग्लास मारुन फेकला-किशोर चौधरी
किशोर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रभाग ४ मध्ये मला भाजपाकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवायची असल्याने पक्षाच्या कार्यालया होणाºया मुलाखतीसाठी कैलास नारायण सोनवणे, धुडकू सपकाळे, सचिन सिताराम माळी, दीपक शरद बुनकर व इतर कार्यकर्ते आलो होतो. मुलाखतीला वेळ असल्याने भाजप कार्यालयाच्यासमोर चहा घेण्यासाठी गेलो असता माझ्या प्रभागातील पंकज अंबादास सोनवणे हा दीड वाजता तेथे आला व त्याने माझ्याकडे पाहून पट ठोकत ‘आता कोण कोण माझ्या वॉर्डात उभे रहातो, त्या एकेकाचे डोके फोडतो’ असे म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली. ‘तु वॉर्डात कसा उभा राहतो व माझ्यासोबत असलेले कैलास सोनवणे व इतरांनाही शिवीगाळ करीत हे तुला कशी साथ देतात’ असे म्हणत जवळच असलेल्या आईस्क्रीमच्या गाडीवरील काचेचा ग्लास माझ्या दिशेने फेकून मारला. हा ग्लास अडविला असता हाताच्या पंजाला दुखापत झाली.
खंडपीठातील खटला मागे घ्यावा यासाठी कैलास सोनवणे यांनी मारहाण केली-पंकज सोनवणे
पंकज सोनवणे यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजपा कार्यालयाकडून घरी जात असताना कैलास नारायण सोनवणे व संजय मुरलीधर साळुंखे या दोघांनी रस्त्यात अडविले. भाऊ प्रशांत सोनवणे याच्या खून प्रकरणात जळगाव न्यायालयात कैलास सोनवणे व इतरांची निर्दोष मुक्तता झाल्याने त्या निकालाला औरंगाबाद खंडपीठात आम्ही आव्हान दिले आहे. खंडपीठातील ही केस मागे घ्यावी म्हणून कैलास सोनवणे व इतरांकडून दबाव येत आहे. आज त्याच कारणावरुन दोघांनी अडवून मारहाण केली. किशोर चौधरी कोण आहे, हे मला माहित नाही. त्याला मी ओळखतही नाही. त्याने उलट आमच्यातील वाद सोडविला. त्याने माझ्याविरुध्द फिर्याद कशी दिली हेच मला कळलेले नाही. मी देखील कैलास सोनवणे, संजय साळुंखे व इतरांविरुध्द तक्रार दिलेली आहे.
सुरुवातीला आबा बाविस्कर व पंकज सोनवणे यांच्यात वाद
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की कैलास सोनवणे हे चहाच्या दुकानावर नगरसेवक डॉ.आश्विन सोनवणे, भाजपाचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक किशोर चौधरी, आबा बाविस्कर हे चर्चा करत बसले होते. त्यानंतर पंकज सोनवणे हे देखील त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी आले. सुरुवातीला आबा बाविस्कर यांच्याशी पंकजयांची शाब्दिक चकमक झाली. यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न कैलास सोनवणे यांनी केला. यावेळी पंकज यांनी कैलास सोनवणे यांना या वादात न पडण्याचा सल्ला दिला.
पंकज सोनवणेला अटक.. भाजपा कार्यालयासमोर झालेल्या हाणामारीप्रकरणी कैलास सोनवणे व पंकज सोनवणे या दोघांच्या गटातर्फे शहर पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यात आल्या. माजी नगरसेवक किशोर भाऊलाल चौधरी यांनी फि र्याद दिली. त्यानुसार पंकज अंबादास सोनवणे (वय ३० रा. रिधुरवाडा, शनी पेठ, जळगाव) याच्याविरुध्द भादवि कलम २९४, ३२४, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लागलीच अटक करण्यात आली. पंकज याने दिलेल्या तक्रारीवरुन कैलास सोनवणे व संजय सांळुखे यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: At the time of the Manappa election meeting in Jalgaon, the Sonawna group came in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.