मागील तीन निवडणुकांपेक्षा यावेळी महिलांची संख्या दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:31 PM2019-10-16T12:31:10+5:302019-10-16T12:31:43+5:30
विधानसभेसाठी सावित्रीच्या दहा लेकी आजमावणार भविष्य
जळगाव : अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जाणाऱ्या महिलांना राजकारणात मात्र कमी स्थान दिले जात आहे. विशेष करून विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांकडून महिलांना म्हणावे तेवढे स्थान दिले जात नाही. यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात १० महिला आपले नशिब अजमावणार आहेत. मागील तीन निवडणुकांपेक्षा ही संख्या दुप्पट आहे.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी महिला उमेदवारांकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
२००४च्या निवडणुकीत रावेर मतदारसंघातून मिनाक्षी शामराव महाजन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती तर अमळनेर मतदारसंघातून काँग्रेसमधून अॅड. ललिता श्याम पाटील, एरंडोल मतदारसंघातून सुमनबाई राजाराम साळवी व मायावती विश्वास पगारे या दोन्ही महिलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातूनच मिनाक्षी साहेबराव महाजन यांनी शिवराज्य पक्षातून, भुसावळ मतदारसंघातून शोभा राजेंद्र भालेराव यांनी अपक्ष म्हणून तर जळगाव शहर मतदारसंघातून सुनिता सिध्दार्थ लोखंडे यांनी बसपामधून निवडणूक लढवली होती. अंमळनेर मतदारसंघातून काँग्रेसमधून अॅड. ललिता शाम पाटील यांनी निवडणूक लढवली.
सन २०१४च्या निवडणुकीत चोपडा मतदारसंघातून माधुरी कृष्णा पाटील यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. भुसावळ मतदारसंघातून डॉ. वंदना वाघचौरे यांनी बसपातर्फे तर पुष्पा सोनावणे यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. जामनेर मतदारसंघातून काँग्रेसमधून जोत्स्ना विसपुते या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या होत्या.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चोपडा मतदारसंघातून लताबाई चंद्रकांत सोनवणे (शिवसेना), माधुरी किशोर पाटील (अपक्ष), भुसावळ मतदारसंघातून गीता प्रशांत खाचणे (अपक्ष), डॉ.मधू मानवतकर, जळगाव शहरमधून वंदना प्रभाकर पाटील (महाराष्ट्र क्रांती सेना), माया बुधा अहिरे (अपक्ष), जळगाव ग्रामीण मधून पुष्पा ज्ञानेश्वर महाजन (काँग्रेस), मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे (भाजपा), ज्योती महेंद्र पाटील (अपक्ष) आणि भुसावळमधून यमुनाबाई रोटे (अपक्ष) अशा नऊ महिला निवडणुकीला सामोरे जात आहेत.
राजकारणात महिलांना आरक्षणाची मागणी होत आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. मात्र विधानसभेतील आरक्षणाचा विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महिलांना अपेक्षित प्रतिनिधीत्व मिळत नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.
सात मतदार संघात नव्हती एकही महिला उमेदवार...
जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे ११ मतदारसंघ येतात. २००४, २००९ आणि २०१४च्या निवडणुकीत सात मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभी नव्हती. या तिन्ही निवडणुकांमध्ये केवळ चार महिला निवडणुकीत होत्या. २०१९मध्ये पहिल्यांदाच १० महिला म्हणजे मागील तीन निवडणुकांपेक्षा दुप्पट महिला उमेदवार उभ्या आहेत.