पुन्हा अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:36+5:302021-01-02T04:13:36+5:30

शेतकऱ्यांची चिंता वाढली : थंड वाऱ्यांना ब्रेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका जळगावकरांनी अनुभवल्यानंतर ...

Timeless crisis again | पुन्हा अवकाळीचे संकट

पुन्हा अवकाळीचे संकट

Next

शेतकऱ्यांची चिंता वाढली : थंड वाऱ्यांना ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका जळगावकरांनी अनुभवल्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यात आगामी चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम राजस्थान भागात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना ब्रेक लागला आहे. तसेच कमी दाबाचा पट्टादेखील तयार होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम शुक्रवारी जिल्ह्यातील वातावरणावरदेखील झालेला पाहायला मिळाला. शुक्रवारी शहरात बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण कायम होते.

जिल्ह्यात यंदा संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला होता. तर, नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीत घट येऊन चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता गेल्या १५ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला होता. तसेच उत्तरेकडून येणारे शीत वारेदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. मात्र, पुन्हा बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानपर्यंत जाऊन उत्तरेकडील थंड वाऱ्यांना धडकल्याने चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तापमानात चार अंशांची वाढ

शुक्रवारी शहरात दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तापमानातदेखील वाढ झाली आहे. गुरुवारी शहराचा किमान पारा ११ अंशांवर होता. तर, शुक्रवारी शहराच्या किमान तापमानात चार अंशांची वाढ होऊन पारा १५ अंशांपर्यंत वाढला होता. कमाल तापमानातदेखील दोन अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणातील गारवा कमी झाला होता. दरम्यान, अजून चार ते पाच दिवस वातावरण स्थिर राहण्याची शक्यता असून, २ व ३ तारखेला पावसाचा अंदाजदेखील हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच तापमानातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.

रब्बीला फटका

ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासह गव्हाच्या वाढीवरदेखील परिणाम होण्याची भीती आहे. अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: Timeless crisis again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.