कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतक-याची आत्महत्या! कुसूंबा येथील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद
By सागर दुबे | Published: March 20, 2023 10:07 PM2023-03-20T22:07:49+5:302023-03-20T22:07:57+5:30
जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना
जळगाव :
जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दीपक संतोष पाटील (३५, रा.कुसूंबा) असे मृत शेतक-याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोमवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दीपक पाटील हे मुळचे झाडी (ता. अमळनेर) येथील रहिवासी आहेत. गावात त्यांची शेती असून शेती करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीसाठी त्यांनी सोसायटीतून कर्ज घेतले होते. पण, निसर्गाचा लहरीपणा आणि हवेतसे उत्पादन नाही, त्यात कर्जाचे डोंगर म्हणून काही वर्षांपूर्वी पाटील हे कुटूंबासह कुसूंबा येथे राहण्यास आले होते. नंतर शेती कामासोबत एमआयडीसी कंपनीत ते हाजमजुरीचे काम करत होते.
आईला पाठविले दुकानात, इकडे मुलाची आत्महत्या
शनिवारी दीपक यांच्या पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी दीपक व त्यांच्या आईच होत्या. रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी आईला दुकानात काही तरी वस्तू घेण्यास पाठविले. आई दुकानावर गेली तेवढ्यात त्यांनी पॅन्टच्या सहाय्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास आई दुकानावरून घरी परतल्यावर त्यांना मुलगा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी आक्रोश केला. त्यानंतर घटनास्थळी रहिवाश्यांची गर्दी झाली. रात्री मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंत मृत घोषित केल्यानंतर सीएमओ डॉ. ममता अच्छा यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. दीपक पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.