बसच्या टपावर ठेवलेले टायर डोक्यावर आदळून दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:52 AM2019-03-06T11:52:03+5:302019-03-06T11:52:11+5:30
एक जण गंभीर जखमी; दोन्ही सख्खे चुलत भाऊ
जळगाव : बसच्या टपावर ठेवलेले टायर रस्त्यावर कोसळून दुचाकीस्वारांच्या अंगावर ते आदळले. यात घनश्याम उमाकांत पाटील (३७) हे जागीच ठार झाले तर मागे बसलेले तापीराम माधवराव पाटील (३६ दोन्ही रा.सावखेडा बु. ता. जळगाव) हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता करंज व सावखेडा गावादरम्यान घडली. घनश्याम व तापीराम दोन्ही सख्खे चुलत भाऊ आहेत. यानंतर संतप्त नागरिकांनी कारवाईच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावखेडा बु. येथील घनश्याम पाटील व तापीराम पाटील हे दोन्ही सख्खे चुलत भाऊ मंगळवारी कामानिमित्त दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी. पी.०८४६) जळगाव शहरातील काम आटोपल्यानंतर घरी परत जात असताना दुपारी चार वाजता करंज व सावखेडा गावाच्या दरम्यान भोकरकडून जळगावकडे येणाऱ्या एस.टी.बसच्या (क्र.एम.एच.२० बी.सी.२४१४) टपावर ठेवलेले टायर (स्टेपनी) अरुंद रस्त्यामुळे कोसळले. ते जमिनीवर आदळल्यानंतर थेट दुचाकीस्वारांच्या अंगावर गेले. त्यात दोन्ही जण जमिनीवर कोसळले. टायरचा मार लागल्याने घनश्याम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा होऊन डोळाच बाहेर आला तर तापीराम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तापीराम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बसचे चालक सिताराम कोळी व वाहक म्हणून विशाल थोरात होते. दरम्यान, यावेळी काही जणांनी फोटोसेशन करण्यातच धन्यता मानल्याचे दुर्देवी चित्र बघायला मिळाले. घनश्याम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला
अरुंद व निमुळत्या रस्त्यामुळे घडली दुर्घटना
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुरेश पाटील (रा.सावखेडा) यांनी सांगितले की, घनश्याम व तापीराम हे दोन्ही भाऊ दुचाकीवरुन जात असताना त्याच वेळी भोकरकडून जळगावकडे एस.टी.बस जात होती. अरुंद व निमुळता रस्ता असल्याने बसच्या टपावर ठेवलेले टायर जमिनीवर कोसळले व ते आदळून दुचाकीस्वारांच्या अंगावर आले. या घटनेनंतर स्वत: सुरेश पाटील, कैलास पाटील, रघुनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले.