चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे ग्रामस्थांचे तितूर पात्रालगत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 08:07 PM2019-02-01T20:07:43+5:302019-02-01T20:09:36+5:30
तितूर नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी झालेल्या वाळूचा पंचनामा करुन वाळू माफियांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हिंगोणे, ता.चाळीसगाव येथील २७ ग्रामस्थांनी १ रोजी सकाळी १० वाजता हिंगोणे गावालगत नदीपात्रालगत बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : तितूर नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी झालेल्या वाळूचा पंचनामा करुन वाळू माफियांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हिंगोणे, ता.चाळीसगाव येथील २७ ग्रामस्थांनी १ रोजी सकाळी १० वाजता हिंगोणे गावालगत नदीपात्रालगत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या मागणीला संतप्त ग्रामस्थांनीही पाठिंबा देवून उपोषणस्थळी ठिय्या मांडला आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे.
या उपोषणात तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, सोसायटी चेअरमन सयाजी पाटील, बाळासाहेब गजमल पाटील, अरविंद चव्हाण, मांगो पाटील, गणेश कोष्टी, गुलाबराव चव्हाण, दीपक चव्हाण, गोविंदराव पाटील, सुरेश चव्हाण, दिलीप पाटील, भगवान पाटील, बाळु पाटील, कैलास पाटील, भगवान पाटील, संजय सुतार, शांताराम चव्हाण, योगेश चव्हाण, अनिकेत चव्हाण, एकनाथ कोष्टी, अभिमान सूर्यवंशी, धनराज चव्हाण, रवींद्र पाटील आदी सहभागी झाले आहे.
२२ रोजी पहाटे तीनला माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी व त्यांच्या दोन साथीदारांनी जेसीबी व डंपरमधून वाळूची चोरी करीत असताना ग्रामस्थांनी अडवले व प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर तिघांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या वर्षभरापासून तितूर नदी पात्रातून वाळूचा अमाप उपसा करण्यात आला. याबाबत तहसीलदार व पोलिसांना अनेकवेळा सांगूनही त्याकडे दुर्लक्ष झाले म्हणून संतप्त ग्रामस्थांनी हा पावित्रा उचलला. त्यामुळे चौधरी व त्यांच्या सहकाºयांनी ग्रामस्थांना धमक्याही दिल्या होत्या. तसेच चौधरी यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंगोणे ग्रामस्थांनी आठ दिवसाआधी केली होती. प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर १ रोजी ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान, ३१ रोजी प्रांत व तहसीलदार यांनी नदीपात्रस्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. या पंचनाम्यावरही ग्रामस्थांचा आक्षेप आहे. नदीपात्रातून वर्षभरात झालेल्या वाळू उत्खननाची मोजमाप करावे व सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध दंडाची आकारणी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
जिल्हाधिकारी किेशोरराजे निंबाळकर यांनी हिंगोणे गावी येवून घटनास्थळी भेट द्यावी. त्यांच्या भेटीने संबंधित अधिकारी वस्तुस्थितीचा पंचनामा करतील आणि वाळू माफियांविरुद्ध निश्चित कारवाई होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.