मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण यांचा गृहमंत्र्यांवर होता दबाव
By विजय.सैतवाल | Published: July 24, 2022 02:37 PM2022-07-24T14:37:35+5:302022-07-24T14:38:53+5:30
Eknath Khadse : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ रेकॉर्डींगचा तपास सीबीआयकडे
जळगाव : माझ्या वाहनामध्ये ड्रग, हत्यार ठेवून मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी मोठे प्रयत्न झाले मात्र ते सर्व अयशस्वी ठरले. यात मला अडकवून संपविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे वारंवार फोन करून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ‘खडसे यांनी वारंवार फोन करून मला वेडे केले आहे’, असे अनिल देशमुख आपल्याला सांगत होते, असा दावादेखील महाजन यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपांचा एकनाथ खडसे यांनी इन्कार केला असून याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेच्या रेकॉर्डींग प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आल्याने या विषयी माहिती देताना गिरीश महाजन ‘लोकमत’शी बोलत होते. त्या वेळी त्यांनी वरील आरोप केला.
आता होणार ‘दूध का दूध, पानी का पानी’
ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेचे रेकॉर्डींग तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सादर केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा तपास सीआयडीकडे दिला. आता हा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याने सर्व समोर येणार असून कोणी काय-काय केले, हे स्पष्ट होईल व ‘दूध का दूध, पानी का पानी’ होण्यास वेळ लागणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
मला अडकविण्यासाठी खिशात घेऊन फिरायचे ड्रग
गिरीश महाजन हे ड्रग माफिया आहे, हे दाखविण्यासाठी माझ्या वाहनात ड्रग टाकण्याचे ठरले होते. यासाठी पोलीसच खिशात ड्रग घेऊन फिरायचे असा आरोपदेखील गिरीश महाजन यांनी केला आहे. यात मी अडकलो पाहिजे म्हणून एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना वारंवार फोन करायचे. यात खडसे हे वारंवार फोन करीत असून त्यांनी मला वेडे करून सोडले आहे, असे खुद्द अनिक देशमुख यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
खडसे कोणाचे बिल भरणार होते हे लवकरच समजेल
ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात जो कट शिजला त्यामध्ये काय-काय करायचे, कोठे जायचे, कोणी कोणाचे बिल भरायचे, जेवणाचे बिल कोणी भरायचे, हे सर्व त्या रेकॉर्डींगमध्ये असून त्यात जळगावातील शिक्षण संस्थेवर दावा करणारे विजय भास्कर पाटील यांनीही काय सुचविले, हे ऐकू येते, असे गिरीश महाजन म्हणाले. खडसे हेदेखील कोणाचे बिल भरणार होते, हेदेखील आता सीबीआय तपासात समोर येणार असल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे. मी कोणाशीच बोललो नाही, असे खडसे त्या वेळी सांगत असले तरी ते काय बोलले हे आता समोर येणार आहे, असेही महाजन यांचे म्हणणे आहे.
रक्ताने माखलेला चाकू ठेवण्याचा प्रयत्न फसला
माझ्या वाहनात ड्रग सोबत हत्यार ठेवण्याचाही कट रचला गेला. यात मला अडकून गिरीश महाजनला संपवायचे नंतर देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे व आपोआप भाजप संपणार, असा प्रयत्न होता, असे महाजन म्हणाले. माझ्या वाहनात चाकू ठेवण्यासाठी विजय भास्कर पाटील हे चाकू घेऊन आलेही होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. या विषयी ॲड. प्रवीण चव्हाण यांनी पाटील यांना जाबही विचारला मात्र तेथे पोलीस असल्याने चाकू ठेवता आली नाही, असे पाटील यांनी त्यांना सांगितले होते, असाही दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. या चाकूला एखाद्या प्राण्याचे रक्त लावून तो वाहनात ठेवण्याचे त्या वेळी ठरले होते, मात्र तो प्रयत्न फसल्याचे महाजन म्हणाले.
ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेच्या रेकॉर्डींग प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे दिला असून त्यातून सर्व स्पष्ट होणार आहे. मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत होते, तसे अनिल देशमुख यांनीच आपल्याला सांगितले होते. कोणी काय-काय केले, हे तपासात लवकरच समोर येईल. - गिरीश महाजन, माजी मंत्री.
गिरीश महाजन यांनी जो आरोप केला, त्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. तपासात जे काही असेल, ते स्पष्ट होईलच. तसेच या विषयी काय निर्णय होतो, ते सर्वांसमोर येईल. - एकनाथ खडसे, माजी मंत्री.