नांदेडला लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:09+5:302021-07-18T04:12:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड, ता. धरणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी झालेल्या लसीकरणाच्या वेळी नागरिकांनी लस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड, ता. धरणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी झालेल्या लसीकरणाच्या वेळी नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. येथे लसीचे डोस आले होते ५० अन् नागरिक मात्र होते दीड-दोनशे. यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी रात्रीपासूनच दगड, विटा वगैरे ठेवून आपले नंबर लावून ठेवले होते. सकाळी आरोग्य केंद्रावर लस टोचून घेण्यासाठी जवळजवळ दीडशे ते दोनशे पुरुष व महिलांची लांबलचक रांग लागली होती. पण लसीचे पन्नास डोस प्राप्त झालेले असल्याचे कूपन घेण्यासाठी एकच गोंधळ उडाला. परिणामी पोलिसांना पाचारण करावे लागले. प्रथम डोस घेणाऱ्या ३०, तर दुसरा डोस घेणाऱ्या २० नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे बहुसंख्य नागरिकांना निराश होऊन घरी परत जावे लागले.
आगामी लसीकरणाच्या वेळी कुठल्याही वशिलेबाजी वा राजकीय हस्तक्षेपाला थारा न देता जे नागरिक नंबर लावून रांगेत उभे राहतील त्यांना नंबरनिहाय कूपनचे वाटप करण्यात येऊन लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नांदेड, नारणे, रोटवद व उखळवाळी या गावांसाठी ५० टक्के याप्रमाणे २०० लस प्राप्त झालेल्या, त्यात एकूण २३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. वेळोवेळी लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील व डॉ. विनय चौधरी यांनी सांगितले.