असंसर्ग आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी तंबाखूमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:35 PM2019-05-18T12:35:46+5:302019-05-18T12:37:12+5:30
तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त सर्व कार्यालयांमध्ये घेणार शपथ
जळगाव : तंबाखूजन्य पदार्थामुळे फुफ्फुसाचे विकार वाढण्यासह ह्रदयाचे आजार, कर्करोग, श्वसनाचे आजार असे असंसर्ग आजाराचे प्रमाण वाढून त्यातूनच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यास आळा बसावा यासाठी यंदाच्या तंबाखू सेवन विरोधी दिनी तंबाखू जन्य पदार्थ सेवन न करण्याची शपथ सर्व शासकीय कार्यालयांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आजाराचा समूळ उच्चाटनाचा संकल्पच आरोग्य विभागाने केला असल्याचेही ते म्हणाले.
तंबाखू सेवन विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी डॉ. चव्हाण यांच्यासह निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, डॉ. नितीन भारती उपस्थित होते. सर्व आजारांचे मूळ तंबाखू पूर्वी संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असायचे. मात्र सध्या कर्करोग, ह्रदयविकार, मधूमेह, श्वसनाचे विकार, अस्थमा, क्षयरोग, वायू प्रदूषण, फुफ्फुसाच्या विकारांमुळे असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. इतकेच नव्हे तर तणावामुळे अपघाताचे प्रमाण वाढून मृत्यूही वाढत असल्याने या सर्व आजारास तंबाखूजन्य पदार्थ कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ सेवनापासून प्रत्येकास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात असून तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तसा संकल्पच करण्यात आल्याचे डॉ. चव्हाण म्हणाले.
सर्व कार्यालयांमध्ये घेणार शपथ
तंबाखू सेवन विरोधी दिनी, ३१ मे रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याविषयीची शपथ घेण्यात येणार असून तसे शपथपत्र सर्व कार्यालयांना पाठविण्यात आल्याचेही या वेळी सांगण्यात आले. मुख्य कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अथवा जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता निश्चित करण्याचे नियोजन असल्याचेही डॉ. चव्हाण म्हणाले. तंबाखूस आळा बसण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन व इतर विभागांसोबतही समन्वय साधून कायद्याचे उल्लंघण करण्याऱ्यांविरोधात मोहीम राबविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
‘तंबाखू आणि फुफ्फुसाचे आरोग्य’ संकल्पना
जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने यंदाच्या तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त ‘तंबाखू आणि फुफ्फुसाचे आरोग्य’ ही संकल्पना घेऊन फुफ्फुसाचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न राहणार आहे. फुफ्फुसाचे आरोग्य सर्वोत्तम राखण्यासाठी धुम्रपान, तंबाखू आणि निष्क्रीय धुम्रपानापासून (सेकंड हेड स्मोकिंग) स्वत:ला दूर ठेवण्यासाठी जनजागृतीवरही भर राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.