आज मतमोजणी, प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:43 AM2019-05-23T00:43:11+5:302019-05-23T00:43:41+5:30
८४ टेबलवर मतमोजणी
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हा प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे. यात बुधवार, २२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सर्वच अधिकाºयांनी मतमोजणी ठिकाणी सर्व तयारीचा आढावा घेतला.
मतमोजणीदरम्यान जळगाव लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २४ फेºयांमध्ये तर रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ फेºयांमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार आहे.
जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होऊन त्यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ५६.१२ टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी ६१.४० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सर्व निवडणूक यंत्र महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षा कोठडीत सिलबंद करून ठेवण्यात आले असून दोन्ही मतदार संघाची २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.
१३२५ कर्मचारी कार्यरत राहणार
प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक, रो आॅफिसर, सुविधा कर्मचारी, टॅबुलेशन कर्मचारी, माध्यम समन्वयक व इतर सर्व कर्मचारी मिळून दोन्ही मतदार संघासाठी एकूण १३२५ कर्मचारी कार्यरत राहणार आहे. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लक्ष ठेवणार आहेत.
टपाली मत मोजणीने सुरुवात
सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सर्वप्रथम सर्व्हीस व्होटर, पोस्टल बॅलेट यांची तपासणी होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणी होईल व मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.