मनपात आज लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:30+5:302021-07-05T04:12:30+5:30
मनपासमोर उपोषण सुरु जळगाव - मनपाकडून गेल्या अनेक वर्षापासून मृत जनावरे वाहून नेण्याचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात ...
मनपासमोर उपोषण सुरु
जळगाव - मनपाकडून गेल्या अनेक वर्षापासून मृत जनावरे वाहून नेण्याचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे या मागणीसाठी मनपा समोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. अशोक सोनवणे व नंदु नाडे हे दोन कर्मचारी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत काम करीत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना अद्यापही कायम करण्यात आलेले नाही. अनेकदा निवेदन देवून देखील मनपा प्रशासन लक्ष द्यायला तयार नसल्याने हे उपोषण सुरु करण्यात आले आहे.
आव्हाणे बस सुरु करा
जळगाव - जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आला असून, आता परिवहन महामंडळाने मोठ्या गावांसह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील बसेस सुरु करण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यातील आव्हाणे येथे देखील बसेस येत नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लवकरात लवकर बसच्या काही फेऱ्या सुरु करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हॉकर्सने पुन्हा थाटली दुकाने
जळगाव - शहरातील मुख्य बाजारपेठ व संकुलामध्ये व्यवसाय करण्यास हॉकर्सला बंदी घातली असताना देखील हॉकर्सकडून रस्त्यालगत दुकाने थाटली जात आहेत. रविवारी महापालिकेला शासकीय सुट्टी असल्याचा फायदा घेत विकेण्ड लॉकडाऊन असतानाही सुभाष चौक, ख्वॉजामिया चौक परिसरात हॉकर्सने दुकाने थाटली होती. यासह काही पदार्थ विक्री करणाऱ्यांनी देखील आपल्या हातगाड्या सुरुच ठेवल्या होत्या.