आज घुमे कां पावा मंजुळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 02:06 AM2018-07-29T02:06:13+5:302018-07-29T02:06:49+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्य संगीत आणि रजत पट’ या सदरात आज बासरी वादक पंडित पन्नालाल घोष यांच्यासंदर्भात लिहिताहेत जळगाव आकाशवाणी केंद्राच्या सेवानिवृत्त उद्घोषिका आणि लेखिका डॉ.उषा शर्मा...

Today, I am proud of you ... | आज घुमे कां पावा मंजुळ...

आज घुमे कां पावा मंजुळ...

Next


जुन्या आणि मधुर गीतांच्या गायक, गायिका मी ओळखू शकते, परंतु उद्घोषणा ऐकल्याशिवाय बासरीवादन कुणाचं हे कळण्याइतपत मी भाग्यवान नाही, की हे पंडित हरिप्रसाद चौरसिया, हे पंडित पन्नालाल घोष, नीलारामाणी, बी.कुंजमणी, राजेंद्र प्रसन्ना, विजय राघव राव, नित्यानंद हळदीपूर, जी.एस. सचदेव, अरविंद गजेंद्रगडकर की रघुनाथ सेठ? काही हिंदी, मराठी गीतांमध्ये पेरलेली बासरी कुणाची हे माहीत असल्यामुळे क्षणभर खूप जाणकार असल्याचा भाव सुखावून जातो आणि भगवान श्रीकृष्णाच्या हातात शोभलेलं ते लोभस वाद्य मला थेट माझ्या आजोळी, मथुरेला- घेऊन जातं.
गो प-गोपिका गाई-वासरं, कदंब वृक्ष, कालिंदीचा किनारा आणि राधेचा रंग बावरा अशा कल्पना जगतात घेऊन जातं... मी म्हणते ‘वाजवी मुरली-देवकीनंदन, कान जिवाचे करी वृंदावन’’ मध्यरात्रीच्या समयी ‘ती’ अर्ध पाण्यात उभी असल्याचा मला भास होतो.. इंदिरा संत तिला चितारू लागतात. अजून नाही राधा जागी, अजून नाही जागे गोकूळ अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे कां पावा मंजुळ? ती ‘कुब्जा’ अवघ्या विश्वाला ओठी लावून मुरलीरव पिऊन टाकते आणि म्हणते हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव !’ मग, या दिग्गज बासरीवादकांची बासरी कुणास्तव? त्यांची आराधना, त्यांचा रियाज, त्यांचे अमरस्वर कुणास्तव? या मर्त्य जगतातील, मर्त्य माणसास्तव !
‘अधर धरे मोहन मुरली पर, होंठ पे माया बिराजे’ अशा शब्दांमध्ये पंडित नरेंद्र शर्मा यांनी बासरीचं मर्म-तत्त्वज्ञान सांगितलं आहे. हरे, हरे बांस की बनी मुरलिया (बाँस-बांबूपासून बनली म्हणून बाँसुरी) मरम, मरम को छुए अंगुरिया.. खळे काकांचं संगीत, पंडित भीमसेन जोशी आणि लतादीदींचा अमृत कोमल स्वर, ‘नाचे राधा बावरी’ हा विशेष कार्यक्रम सादर करताना मीच बावरले... कुठली गीतं घ्यावी हा यक्ष प्रश्न. थेट के.एल.सैगल (राधेरानी पे डारो न) ते ए.आर. रहमान (राधा कैसे ना)... मंग संगीतकार हंसराज, शंकर जयकिशन, नौशाद, बर्मनदा गीते? शकील - ‘गिरीधर की मुरलिया बाजे रे’ तसंच सुरेश भट ‘हाय फिरून वाजली ती बासरी, राधिके जपून जा तुझ्या घरी.’ चित्रासिंहचा अल्बम घेतला. मुरलिया बाजे रे जमुना के तीर, गुलजार घेतले- मुरली मेरे श्याम की- सारी गीतं बासरी वादक रघुनाथ सेठ यांनी स्वरबद्ध केलेली.
असं हे तन-मन विसरायला लावणारं इवलुसं वाद्य, लोकवाद्य ते शास्त्रीय वाद्यसंगीताच्या मैफिलीत आणि पुढे रजतपटाच्या माध्यमातून रसिकांपुढे आणण्याचं श्रेय पंडित पन्नालाल घोष यांना जातं (पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचाही सहभाग आहे, तो संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासमवेत, त्यासंदर्भात आपण पुढील लेखांकात बघू या). ‘बांसरी के मसीहा’ म्हणून ज्यांची ओळख ते युगपुरुष पन्नालाल घोष (मूळ नाव अमलज्योती घोष) यांचा पूर्व बंगालच्या बारीसाल इथं जन्म. वडील अक्षयकुमार हे सुप्रसिद्ध सतारवादक.
पन्नालाल यांची पहिली एल.पी. १९३० यावर्षी प्रकाशित झाली. १९३८ पासून पुढे काही काळ युरोप दौरा केला. ४० ते १०० रुपये महिन्याने एच.एम.व्ही. आणि कोलंबिया या कंपन्यांमध्ये नोकरी केली, पुढे चित्रपटांना पार्श्वसंगीत देण्यातही रममाण झाले. त्यांची स्वतंत्र, संगीतकार म्हणून पहिली फिल्म ‘स्नेहबंधन’.
त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये घोषबाबूंूंचं संगीत रसिकांना ऐकायला मिळालं. ‘अंजान’ (१९४१- निर्देशक अमेय चक्रवर्ती) या चित्रपटातील गीतं प्रदीप आणि पी.एल. संतोषी यांची. भूमिका अशोककुमार आणि देविका राणी! दोन गाणी अजूनही ऐकायला मिळतात. ‘मेरे जीवन के पथपर’ आणि ‘आई पश्चिम की घटा.’
त्यानंतर ‘बसंत’ (१९४२- हा चित्रपट- भूमिका मधुबाला, मुमताज शास्त्री, उल्हास. गायकांमध्ये घोष बाबू यांच्या पत्नी- पारुल घोष, खान मस्ताना सुरेश... इत्यादी. ‘हुआ क्या कसूर’ आणि ‘तुमको मुबारक’ ही गाणी अजून कर्णामृताचं कार्य करतात.
‘मॅजिक आॅफ फ्लूट’ आपण अनुभवतो ते बसंतबहार या चित्रपटातील ‘मै पिया तेरी, तू माने या ना माने’ या गीतातून. खरंच घोष बाबूंची मुरली ‘दिल घायल’ करते. मुगल-ए-आझम हा के. असीफ यांचा चित्रपट सर्वांग सुंदर, अभिनय संगीत, गायक-गायिका! लक्षवेधी ठरते ती घोष बाबूंची बासरी ‘मोहे पनघट पे नंदलाल’ या गीतातून!
त्यांनी पार्श्वसंगीत दिलेल्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करायला हवा- १९५१ चा आंदोलन, भलाई (१९४३), सवाल (१९४३) बीसवी सदी (१९४५) इंतजार आदी.
आज या गीतांना अर्ध शतकापेक्षा अधिक वर्षे लोटलीत. परंतु ऐकताना वाटतं हे काल परवाचंच गीत... हीच योगेश्वराची बासरी... हिच ती राधा म्हणणारी...
बावरी मैं बन गयी, कन्हैया तोरी मुरली बैरन भई !
- डॉ.उषा शर्मा, जळगाव

Web Title: Today, I am proud of you ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.