आजचा काळ रंगभूमीसाठी पोषक नाही - नाटककार जयंत पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:43 AM2019-11-13T00:43:28+5:302019-11-13T00:43:45+5:30
नाटक जगण्यासाठी हौशी रंगभूमी जगणे गरजेचे
आनंद सुरवाडे
जळगाव : नाटकांमध्ये शोध थांबलेला आहे, त्यामुळे नाटक ज्या झपाट्याने पुढे जायला हवे होते तसे ते जात नाहीय़ आजचा जो काळ आहे तो रंगभूमीला पोषक नाही, असे मत ज्येष्ठ लेखक, नाटककार, नाट्य समिक्षक जयंत पवार यांनी मांडले़
विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमासाठी ते सोमवारी जळगावात आले होते. ह्यलोकमतह्णने त्यांच्याशी संवाद साधला़ हौशी रंगभूमीला उत्तेजना मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़
प्रश्न: आजचे नाटक कुठल्या स्थानी आहे?
जयंत पवार: व्यावसायीक नाटक चांगली वाटचाल करीत आहेत. पण एकूण नाटक पुढे जाण्याच्या दृष्टीने हा काळ बिकट आहे़
प्रश्न : नवीन पिढीच्या नाटकांकडे कसे बघता ?
नवीन पिढीमध्ये नाटककार कमी आहेत़ याचामध्ये व्यावसायिक रंगभूमीवर नवीन आशयाची नाटके येत नाही़ ही नाटके सादरीकरणामध्ये चटपटती व आकर्षक नक्कीच झाली आहे, मात्र, नवीन विषय जे आजच्या जीवनाशी निगडीत आहे ते मांडत नाहीत, वरवरचा मुलामा असा दिसतो की आजच्या स्थितीतबाबत बोलतात मात्र, ते जे बोलतात त्यातून ते कालचेच विधान करतात़ विधान म्हणून आजच काही येत नाही़
प्रायोगिक रंभूमीची आजची अवस्था काय आहे?
जयंत पवार: अत्यंत बिकट आहे कारण प्रायोगिक रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी जे रंगकर्मी हवेत त्यांची वाणवा आहे़ नाटकारांमध्ये रंगभूमीचा, नाट्यतत्त्वांचा शोध घेण्याची ईर्ष्या नष्ट झालेली आहे़ दोन चार लोक व दोन चार संस्थांसाठीच प्रायोगिक रंगभूमी आहे़
प्रश्न: सध्याच एकंदरीत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण आजच्या नाटकांमध्ये झळकते का?
जयंत पवार: पुरेस जाणवत नाही़ व्यावसायिक नाटक हे राजकीय परिस्थितीपासून कायमच पळत राहीले आहे़ त्यांनी तो धोका घेतलेला नाही़ आणि नाटकांमधील सामाजिकता ही वरवरची वाटते़ ती खूप शहरी सामाजिक आहे़ ग्रामीण जीवन नाटकांमध्ये कधीच आली नाही़ याला अगदी मोजकेच अपवाद आहेत़ शोध थांबलेला आहे़ नाटक झपाट्याने पुढे जात नाही़ आजचा काळ हा रंगभूमीला पोषक नाही़
प्रश्न: नाटक जगविण्यासाठी काय व्हायला हवे?
जयंत पवार: हौशी रंगभूमी जगायला पाहिजे़ हौशी रंगभूमीला उत्तेजना मिळेल असे प्रयत्न सरकार आणि नाट्यपरिषदेकडून व्हायला हवेत़
या रंगभूमीला जाणवणाने अडथळे कसे कमी होतील हे पाहिले पाहिजे़ जळगावात जी हौशी पातळीवर काम करतात ती तळमळीने काम करतात त्यांना स्थानिक प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे़ परिवर्तन संस्थेने केलेली नाटके चांगली आहेत़