शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून ५० टक्केच कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:46 PM2020-03-20T12:46:45+5:302020-03-20T12:47:14+5:30
३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून आदेश लागू
जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. याची अंमलबजावणी २० मार्चपासून होणार असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही सूचित केले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्केच अधिकारी व कर्मचारी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात शासकीय कार्यालयांचे तातडीचे व महत्त्वाचे काम सुरू राहण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलविता त्यांना आळीपाळीने (रोटेशन) कार्यालयात बोलवावे, अशा सूचना केल्या आहेत.
यात अधिकारी व कर्मचाºयांना कार्यालयीन वेळेमध्ये लवचिकतेची सवलत देण्यासंदर्भातसुद्धा विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देशित केले आहे. जे अधिकारी, कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना तातडीने रजा मंजूर करण्याचा निर्णय घ्यावा, यात अधिकारी, कर्मचाºयांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, प्रमुखांना उपलब्ध करून द्यावा तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना मिळताच उपस्थित राहणे अनिवार्य राहील, असेही आदेशात म्हटले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.