जगाला आज संत तुकाराम, गौतम बुद्ध यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 01:46 PM2017-04-22T13:46:24+5:302017-04-22T13:46:24+5:30
प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे.
अतुल पेठे : ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर मांडले परखड मत
जळगाव, दि. 22 - आजचा समाज हा स्थलनशील समाज आहे, असे म्हटले जाते. प्रत्येक काळातील समाज हा नेहमीच सारखाच असतो. सांस्कृतिक आव्हान हेदेखील सारखेच असते. मात्र त्या प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या काळातदेखील संत तुकाराम, गौतम बुध्द कसे निर्माण होतील याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे मत प्रसिध्द नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले.
परिवर्तन संस्था जळगाव व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. विजय पाटील, प्रा.शेखर सोनाळकर, मंजुषा भिडे आदी उपस्थित होते.
प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हान
अतुल पेठे म्हणाले की, प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हान हे कायम राहिले आहे. संत ज्ञानेश्वर, सॉक्रेटीस, संत तुकाराम या प्रत्येक संताला, राष्ट्र पुरुषाला आप-आपल्या काळात सांस्कृतिक लढाया या लढाव्या लागल्या. प्रत्येक कालखंडात एक नवीन आव्हान हे सांस्कृतिक क्षेत्रासमोर असते. संत तुकारामांनी या विरोधात आपल्या लेखनी, आपल्या अभंगातून विषमतेचा हुंकार भरत ही लढाई जिंकली. सांस्कृतिक आव्हान ङोलण्यासाठी विचार प्रवृत्ती, समृध्द विचार मनात निर्माण होणे गरजेचे असल्याचे पेठे म्हणाले.
आजच्या काळाची भीती वाटते
सध्याचा काळ पाहता या काळाची भीती वाटत असल्याचे अतुल पेठे म्हणाले. आज अमेरिकेने अफगाणिस्तानवर ‘मदर बॉम्ब’ टाकला. उद्या उत्तर कोरिया ‘फादर बॉम्ब’ टाकेल. सध्या सगळे जग पेटेलेले आहे. येणा:या पिढीला आपण काय देणार आहोत? असा प्रश्न नेहमी निर्माण होतो. यामध्ये माझी जबाबदारी काय? हे ओळखणे गरजेचे आहे. कलावंतानी आप-आपल्या कलेला आयुध बनवून या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.