आजची शिक्षण पध्दती पुस्तकी शिक्षण व गुणांवर भर देणारी, तिला व्यवहारिक पातळीवर नेण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 05:05 PM2019-10-24T17:05:35+5:302019-10-24T17:05:54+5:30
अंजिक्य कोत्तावार : विद्यार्थ्यांच्या समस्यांचे केले निरसन
जळगाव - आजची शिक्षण पद्धती पुस्तकी शिक्षण व मार्कांवर अधिक भर देणारी असून त्याला व्यावहारिक पातळीवर नेण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक गोष्टीतून शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्यास शिक्षणाचा उद्देश सध्या होईल असे प्रतिपादन युवा संशोधक व सर्वात जास्त पेटंट नावावर असलेल्या अजिंक्य कोत्तावार यांनी केले.
रोटरी क्लब जळगाव वेस्ट व आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गप्पा इंडियाशी हा कार्यक्रम बुधवारी रोटरी भवनात पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ याप्रसंगी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार राणे, सचिव सुनील सुखवाणी, कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी व प्रशांत महाशब्दे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला चालना द्या
आपल्या मनोगतात कोत्तावार पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला चालना दिली पाहिजे त्यासाठी पालकांनी पाल्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली पाहिजे व त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. दैनंदिन जीवनातील समस्यांना उत्तर शोधण्याचे काम प्रत्येक माणूस करीत असतो. यातून एका नाविन्यपूर्ण आविष्काराची तो अनुभूती घेतो. त्यांना सापडलेले उत्तर सामन्यांना उपयुक्त ठरावे, ते व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्षात साकारावे यासाठी उद्योजकीय गुणांद्वारे उद्योग क्षेत्राची निर्मिती होते. यातूनच अनेकांना चांगले रोजगार उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारेच आपण बेरोजगारीच्या समस्येला उत्तर शोधू शकतो असे ते म्हणाले. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांची व आवडीच्या क्षेत्राची ओळख झाली पाहिजे व तीच यशस्वी करिअरची पायाभरणी असते असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर प्रशांत महाशब्दे यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लबच्या मायादेवी नगरातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.