कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:19 IST2018-08-10T16:15:12+5:302018-08-10T16:19:47+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार शनिवार, ११ आॅगस्ट पासून ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असा अंमलात येत आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार शनिवार, ११ आॅगस्ट पासून ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असा अंमलात येत आहे. या नामविस्तारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित आनंद सोहळा मात्र रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या उपलब्धतेनुसार लवकरच आनंद सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे उमविचे कुलसचिव भ.भा.पाटील यांनी सांगितले.
जुलै महिन्यात नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असा नामविस्तार करण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले होते. ११ आॅगस्ट रोजी हा नामविस्तार करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशनाच्या काळात केली होती. विद्यापीठाला शुक्रवारी नामविस्ताराची अधिसूचना प्राप्त झाली आहे. त्यानुसार शनिवार, ११ आॅगस्ट पासून ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असा नामविस्तार करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवारपासून नामविस्तार अंमलात येणार आहे. मात्र या नामविस्ताराचा आनंद सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपलब्ध तारखेनुसार लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती कुलसचिव भ.भा.पाटील यांनी दिली.