अर्थसंकल्पातील दुरुस्तीवरून आजची सभा गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:15 AM2021-04-19T04:15:00+5:302021-04-19T04:15:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा उद्रेक सुरू असताना आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट करण्याला प्राधान्य न देता अन्य बाबींसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा उद्रेक सुरू असताना आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट करण्याला प्राधान्य न देता अन्य बाबींसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद ठेवण्यात आल्याने या अर्थसंकल्पात विरोधी सदस्यांनी अनेक दुरुस्त्या सुचविल्या होत्या. मात्र, या दुरुस्त्या झालेल्या नसून, किमान सर्वसाधारण सभेत तरी यबाबत काही हालचाल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत विराेधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आराेग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी अखेर सर्व सदस्यांचे किमान एक महिन्याचे मानधन निधी म्हणून आरोग्य विभागाला द्यावे, असाही एक सूर विरोधी सदस्यांमधून समोर येत आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेेचे सोमवारी अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यतेखाली ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याने सर्वच सभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या २२ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यात सेस फंड घटल्यामागची विविध कारणे, तसेच अनेक विभागांनी त्यांचेच उत्पन्न दाखविले नसल्याचा अर्थात अभिसरण निधी दाखविला नसल्याचा, तसेच आरोग्यावर अधिकाधिक निधी ठेवावा, अशी मागणी शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केला होता. मात्र, या दुरुस्ती अद्याप केलेल्या नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हा मुद्दा गाजणार आहे.
राजकीय हालचाली
नुकतीच महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जिल्हा परिषदेत सत्तांतराचे वारे सुरू झाले होते. यामुळे भाजपच्या सदस्यांनी सावध पवित्र घेतला आहे. त्यातच जामनेर संकुलाच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नुकतीच ही समिती येऊन गेल्याने हा विषय सध्या जिल्हा परिषदेत चांगलाच तापला आहे. याबाबतही या सभेत वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहे. स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी या मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.