जळगाव-धुळेदरम्यान १ जुलैपासून ‘टोल’वसुली; रस्त्याच्या कामानुसार रक्कम ठरणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 02:44 PM2023-04-18T14:44:51+5:302023-04-18T14:45:20+5:30
पारोळा व फागणे बायपासवरुन एप्रिलअखेरीस वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली.
- कुंदन पाटील
जळगाव : तरसोद (जळगाव) ते फागणे (धुळे) यादरम्यान सबगव्हाण (पारोळा) येथे असलेल्या टोलवर १ जुलैपासून वसुली सुरु होणार आहे. चौपदरीकरण कामाच्या अंतरानुसार ही रकम निश्चीत केली जाणार आहे. तर पारोळा व फागणे बायपासवरुन एप्रिलअखेरीस वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली.
तरसोद ते फागणे या ८७.३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला २०१९ मध्ये प्रत्यक्षात सुरु करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाची लाट आल्याने हे काम थांबले होते. सुमारे ९४० कोटींच्या या रस्त्याचे ८० टक्के चौपदकरीकरण पूर्णत्वास आले आहे. फागणे, मुकटी व पारोळा येथील बायपास तर एरंडोल येथील उड्डाणपुलाच्या कामाव्यतिरिक्त पाळधी ते फागणेदरम्यान बहुतांश रस्त्याचे चौपदरीकरण आटोपले आहे. चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या तुलनेत संबंधित ठेकेदाराकडून सबगव्हाण येथील केंद्रावर टोल वसुली सुरु होणार आहे. त्यामुळे १ जुलैनंतर जळगाव-धुळेदरम्यानचा प्रवास महागणार आहे.
सप्टेबरनंतर जळगावबाहेरुन वाहतूक जाणार
दरम्यान, जळगाव शहराला बायपास असणाऱ्या १७.७ किलोमीटर रस्त्याचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या बायपासवर गिरणा नदीवरचा पूल, रेल्वेमार्गातील दोन उड्डाणपूल व तीन भुयारी मार्ग आहेत. तसेच पाळधीनजीक उड्डाणपुल आहे. या कामांसाठी जास्तीचा वेळ जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतर जळगावला बायपास करुन वाहतूक सुरु होईल, असेही सिन्हा यांनी सांगितले.
...म्हणून टोल हलविला
सुरुवातीला विचखेडा ता. पारोळा येथे टोल नियोजित होता. मात्र नगरपालिका क्षेत्रालगत टोल नको, या धोरणानुसार ही यंत्रणा सबगव्हाण येथे हलविण्यात आली असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.