जळगाव जिल्ह्यात शेतकरी संपामुळे टमाटे, हिरवी मिरची कडाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 07:11 PM2018-06-03T19:11:32+5:302018-06-03T19:11:32+5:30
भाजीपाला लिलाव सुरळीत
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३ - आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसºया दिवशीही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून मराठवाडामार्गे आंबे घेवून येणारी वाहने न आल्याने आंब्याची आवक घटली आहे. सोबतच टमाटे व हिरवी मिरचीची आवक कमी झाल्याने टमाट्याचे भाव दुप्पट तर मिरचीचे भाव दीडपटीने वाढले आहे.
शेतमालास हमी भाव व संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये बदल करावा या याप्रमुख मागण्यांसाठी शेतकºयांच्या देशव्यापी संपास १ जून पासून सुरूवात झाली. संपाचा आज दुसरा दिवस होता.
कर्नाटकातील आंबा थांबला
जळगावात संपाचा फारसा परिणाम नसला तरी कर्नाटकातून आंबे घेऊन येणारी वाहने जळगावात येऊ शकली नाही. ही वाहने मराठवाडामार्गे येतात. परिणामी दक्षिण भारतातील आंबा येथे येणे थांबला आहे. मात्र गुजरातमधून आंब्याची आवक सुरू असल्याने आंब्याच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही.
टमाटे, हिरवी मिरचीची आवक घटली
मराठवाड्यातील काही भागासह पाटणादेवी येथून येणाºया टमाट्याची आवक घटली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोनच दिवसात टमाट्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहे. बाजार समितीमध्ये ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ३० ते ४० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.
हिरवी मिरचीदेखील उत्तर भारतातून येत असल्याने दोन दिवसांपूर्वी निघालेला माल येथे येऊ शकला, मात्र पुढे काही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हिरव्या मिरचीचेही भाव १५०० रुपये प्रती क्विंटलवरून २००० ते २५०० रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ४० ते ४५ रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. आधीच उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक कमी असल्याने त्यांचे भाव वाढलेले आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे.
धान्याचीही आवक थांबली
संपामुळे धान्य विक्रेतेही बाजार समितीत धान्य आणत नसल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दिवशी ५० टक्केच आवक होऊ शकली व दुसºया दिवशी शनिवारी तर आवक नसल्या सारखीच होती, असे व्यापाºयांनी सांगितले.
शेतकरी संप काळात ‘अॅलर्ट’ राहण्याबाबत सूचना असून त्यानुसार मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात आहे. सर्व बाजार समितींनाही सूचना देण्यात आल्या असून २४ तास लक्ष ठेवून आहे.
- विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक
शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी धान्याची ५० टक्केच आवक होऊ शकली व २ रोजी तर आवक नसल्यासारखीच होती.
- शशी बियाणी, धान्य व्यापारी.
संपाच्या दुसºया दिवशी भाजीपाल्याचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून येणाºया आंब्याची वाहने येऊ शकली नाही. सध्या टमाटे व हिरवी मिरचीची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढले आहेत.
- वासुदेव पाटील, सुपरवायझर, कृउबा, जळगाव.