चोपडा रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:24 PM2018-04-05T17:24:55+5:302018-04-05T17:24:55+5:30
भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले महामार्गावर
आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.५ : प्रत्येक भाजीची चव वाढविणा-या टोमॅटोचे भाव पडल्याने तो बेचव झालेला आहे. ४० ते ५० रुपये कॅरेट अशी विक्री होत असलेल्या टोमॅटाला भाव नसल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतक-याने गुरुवारी सकाळी महामार्गावर टोमॅटो फेकल्याने लाल चिखल निर्माण झाला आहे.
सध्या कमी होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत घट होत आहे. काही शेतक-यांच्या कुपनलिका तर बंद पडल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांवर उभ्या पिकावर नांगर फिरविला जात आहे. अशा परिस्थित शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. मात्र बाजारात गोबी, गड्डा गोबी, टोमॅटो, तसेच अन्य भाजीपाला पिकांना भाव नसल्याने शेतक-यांना भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. सध्या चोपडा तालुक्यातील आडगाव, लासूर, चोपडा, वडती, शिरागड, शिरपूर तालुक्यातील तरडी येथून टोमॅटोची आवक सुरु आहे. गुरुवारी धानोरा येथील बाजारात चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला २० किलो कॅरेटसाठी ४० ते ६० रुपये असा भाव होता. तर बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडून १० रुपयाला दीड किलो टोमॅटोची विक्री केली जात आहे. त्यातच मध्यम प्रतीच्या टोमॅटोला व्यापारी घेत नसल्याने शेतक-यांच्या वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही आहे.
गुरुवार ५ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर बु-हाणपूर महामार्गावरील चोपडा-अडावद दरम्यान असलेल्या कृषितंत्र महाविद्यालयासमोर पुलावर एका शेतक-याने सुमारे तीन ते चार क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. शेतातून माल काढून आणल्यावर बाजारात भाव मिळत नसल्याने अतिशय उद्विग्न अवस्थेत शेतक-याने हा माल रस्त्यावर फेकला आहे.