उद्यापासून एस.टी. धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:16 PM2020-05-21T12:16:17+5:302020-05-21T12:16:31+5:30
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून थांबलेल्या एस. टी बसेस्ची चाके २२ मे पासून पुन्हा धावणार आहेत. शासनाने बस सेवा ...
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून थांबलेल्या एस. टी बसेस्ची चाके २२ मे पासून पुन्हा धावणार आहेत. शासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असून, जिल्हाभरातील अकरा आगारांमधून सकाळी सात वाजता बसेस् सुटणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आल्याने गेल्या २३ मार्च पासून महामंडळाची सेवा बंद आहे. सेवा बंद असल्यामुळे महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न थांबले असून, परिणामी यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारदेखील रखडले. गेल्याच आठवड्यात परप्रांतीय बांधवांना सीमेवर सोडण्यासाठी एस.टी महामंडळाची सेवा सुरू झाली आहे. मात्र, सर्व सामान्य प्रवासी आणि चाकर मान्यासांठी सेवा कधी सुरू होणार, याबाबत सर्वांची प्रतीक्षा होती. अखेर शासनाने बुधवारी बस सेवा सुरु करण्याचे महामंडळाला आदेश दिले असून, तसे आदेश जळगाव विभागाला बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेत.
सायंकाळी सात वाजेपर्यंत धावणार बसेस्
जिल्ह्यामधील विविध आगारांमधून सकाळी सात वाजता पहिली बस सुटणार आहे. सायंकाळी सात पर्यंत या बसेस धावणार आहेत. जळगाव, अमळनेर, पाचोरा व भडगाव येथे रुग्ण संख्या जास्त असल्यामुळे येथील फेºया बंद राहणार आहेत. स्थानकातून बस निघण्यापूर्वी प्रत्येक बस सॅनिटाईज केली जाणार आहे. बस सेवा सुरू होणार असल्याने विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाभरातील सर्व आगार व्यवस्थापकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. सेवा सुरु करण्यासाठी बसेसची देखभाल करुन, बसेस सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या.
शासनाच्या सुचनेनुसार २२ मेपासून बस सेवा सुरू होणार आहे. ही सेवा जिल्हा अंतर्गंतच असून, सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत बसेस सुरु राहतील. बसमध्ये सोशल डिस्टनिंगचे पालन करण्यात येणार असून एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशानांच प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सेवे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, निर्णय घेण्यात येईल.
-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव