खुबचंद साहित्या हल्ला, दोघांचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:13 PM2020-03-04T12:13:56+5:302020-03-04T12:14:50+5:30
जळगाव : बांधकाम व्यावसायिका खुबचंद साहित्या यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश अशोक बाविस्कर (२५, रा.तुरखेडा, ता. ...
जळगाव : बांधकाम व्यावसायिका खुबचंद साहित्या यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश अशोक बाविस्कर (२५, रा.तुरखेडा, ता.जळगाव) व नरेश नंदू आगरिया (२४,रा.वाघ नगर) या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला.
खुबचंद साहित्या यांच्यावर १६ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजता गोरजाबाई जिमखान्यासमोर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हेसह राकेश चंदू आगरिया (२२, रा.वाघ नगर), निलेश उर्फ बंटी नंदू पाटील (२४, रा. फागणे, ता. जि. धुळे ह.मु.ललित कोल्हे यांचे घर), नरेश नंदू आगरिया (२४, रा.वाघ नगर) व गणेश अशोक बाविस्कर (२५, रा. तुरखेडा, ता.जळगाव) या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी राकेश व निलेश यांना २१ जानेवारी रोजी तर नरेश व गणेश या दोघांना २२ जानेवारी रोजी अटक झाली होती. मुख्य आरोपी ललित कोल्हे घटना घडल्याच्या दिवसापासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अशी आहे जामीन नाकारण्याची कारणे
अटकेतील नरेश आगारीया व गणेश बाविस्कर या दोघांतर्फे न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आले. त्यावर न्या. आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात मंगळवारी कामकाज झाले. या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून गुन्हा अजामीनपात्र असून सत्र न्यायालयात चालणार आहे, संशयित हे गुंडगिरी करण्यासाठी ललित कोल्हेकडे अंगरक्षक व चालक आहे,
ते जामिनावर सुटल्यावर ललित कोल्हे यास फरार राहण्यास मदत करतील, तसेच साक्षीदारांना धमकावून तपासकामी अडथळा निर्माण करतील, या कारणांच्या आधारावर सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तीवाद केला.
त्यावर न्या. आर.जे. कटारिया यांनी दोघांचे जामीनअर्ज फेटाळून लावले आहे.
ललित कोल्हेविरुध्द अनेक गुन्हे
या गुन्ह्यात फरार असलेले संशयित ललिल कोल्हे याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो कायद्याला जुमानत नसल्याचे म्हटले आहेत. तसेच शिक्षा झालेली असतांनाही महापौर झाला असून त्याच्याकडे राजकीय व आर्थिक पाठबळ असल्याने फिर्यादी साहित्या यांच्या जीवास धोका असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.