बोदवड येथील लाचखोर पुरवठा अव्वल कारकून निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:59 AM2019-12-27T11:59:42+5:302019-12-27T12:00:11+5:30
जळगाव : शिधा पत्रिकांसाठी तीन हजार सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बोदवड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संजय देविदास पाटील याला ...
जळगाव : शिधा पत्रिकांसाठी तीन हजार सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बोदवड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संजय देविदास पाटील याला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले असून तसे आदेश काढण्यात आले आहे. निलंबन काळात पाटील यांचे मुख्यालय एरंडोल तहसील कार्यालय राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
संजय पाटील हे दोन वर्षांपासून बोदवड येथे तहसील कार्यालयात असून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराने तीन जणांच्या शिधापत्रिका बनवून मागितली असता प्रत्येक शिधा पत्रिकेचे एक हजार दोनशे प्रमाणे तीन शिधापत्रिकांचे एकूण तीन हजार सहाशे रुपयांची मागणी पाटील याने केली होती.
१७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पुरवठा विभागाच्या कार्यालयातच पाटील यास लाच स्वीकारता पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून १८ रोजी भुसावळ न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पाटील याचा पोलीस कोठडीतील काळ ४८ तासापेक्षा जास्त असल्याने त्यास निलंबित करीत असल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.
निलंबन काळात पाटील यांचे मुख्यालय एरंडोल तहसील कार्यालय राहणार असून पाटील यांना एरंडोल तहसीलदारांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.