आमदार सुरेश भोळे यांच्या हॉटेलमध्ये रात्री तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:10 PM2019-01-16T13:10:53+5:302019-01-16T13:11:33+5:30
दोन जणांना अटक
जळगाव : भाजपा आमदार सुरेश भोळे यांच्या मालकीच्या शाहू नगरातील हॉटेल वूडलँडमध्ये बील देण्याच्या कारणावरुन वाद होऊन दारुच्या बाटल्या व शोकेसचे काच फोडल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करुन कलम १५१ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नीलेश संतोष साळुंखे (२३) व विनोद उर्फ विक्की किशोर रणसिंग (२६ दोन्ही रा.शाहू नगर, जळगाव) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आमदार भोळे यांच्या मालकीची शाहू नगरात वूडलँड नावाची हॉटेल व परमीट रुम बियरबार आहे. नीलेश साळुंखे व विक्की रणसिंग हे दोन्ही सोमवारी रात्री या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे ९ वाजता बील देण्याच्या कारणावरुन व्यवस्थापक विठ्ठल सुपडू कोळी (३०, रा.अयोध्या नगर, जळगाव) व वेटर जयप्रकाश यांच्याशी दोघांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की नीलेश व विक्की यांनी दारुच्या बाटल्या फोडून दारु बाटल्यांचे शोकेशही फोडले. त्यामुळे हॉटेल व बाहेर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस पोहचल्याने टळली मोठी घटना
शाहू नगर परिसरात वाद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तातडीने गस्तीवरील कर्मचारी शाहू नगरात रवाना केले. हॉटेलच्या बाहेर प्रचंड गर्दी होती व हॉटेलमध्ये वाद सुरु होता.पोलिसांनी नीलेश व विक्की या दोघांना ताब्यात घेतले. व्यवस्थापक विठ्ठल कोळी याच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर कलम १५१ प्रमाणे कारवाई करुन अटक केली.पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे या भागातील संभाव्य मोठी घटना टळली.