कोरोना थांबेना, कुसुंब्यात शिरकाव, जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ५२८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 01:15 PM2020-05-28T13:15:04+5:302020-05-28T13:16:45+5:30
पहूर येथील दोन जणांचा समोवश
जळगाव : गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा रुग्ण आढळून येत असून गुरूवारी सकाळी आणखी पाच नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या ५२८ वर पोहचली आहे़ जळगावात तालुक्यात कुसुंबा येथे एका ४८ वर्षीय प्रौढाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे़ ग्रामीण आरोग्य यंत्रणा कुसुंब्यात पोहचली आहे़
दरम्यान, गुरूवारच्या अहवालांमध्ये पहूर येथील दोन तर जामनेर, जळगाव व रावेर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने होत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे़
जळगाव, जामनेर, पहूर व रावेर येीिल २२ अहवाल सकाळी प्राप्त झाले़ यात १७ अहवाल निगेटीव्ह आले तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
२१८ रुग्ण बरे
कोरोनाची आकडेवारी वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिलासादायक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ ५२८ रुग्णांमध्ये २१८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे़
दोन दिवसात दहा जणांचा मृत्यू
कोरोना बाधितांची मृत्यू संख्या आटोक्यात आणण्यात अद्यापही यंत्रणेला यश मिळाले नाही. गेल्या दोन दिवसात दहा बाधितांचा मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यात ५२८ रुग्णांमध्ये तब्बल ६४ बाधितांचा मृत्यू झाला आहे़ हा मृत्यूदर अधिकची चिंता वाढविणारा असून स्थानिक यंत्रणेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़ भुसावळात सर्वाधिक १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्या खालोखाल अमळनेर व जळगाव अशी मृत्यूची संख्या आहे़
आरोग्य विभागाचे आवाहन
नागरिकांनी पत्ता सांगताना सहकार्य करावे, कुठलीही भिती न बाळगता माहिती लपवू नये, माहिती लपविल्याने धोका अधिक असतो़ अशा स्थितीत आरोग्य विभागाला सहकार्य करावे, शिवाय जे खासगी रुग्णालये बंद आहेत, त्यांनी पूर्ण सुरक्षा घेऊन त्यांनी रुग्णांना तपासावे व काही लक्षणे असल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ संजय चव्हाण यांनी केले आहे़