तोतया प्राध्यापकाने दोघींना फसवून थाटला तिसरीशी संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:00+5:302021-02-26T04:22:00+5:30
जळगाव : आधी एकीशी साखरपुडा, दुसरीशी तोतयेगिरी करुन तिसरीशी संसार थाटून तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पियुष हरिदास बावस्कर ...
जळगाव : आधी एकीशी साखरपुडा, दुसरीशी तोतयेगिरी करुन तिसरीशी संसार थाटून तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पियुष हरिदास बावस्कर या तोतया प्राध्यापकासह त्याचे वडील हरिदास खंडू बावस्कर, सासु वासंती बावस्कर व चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर (सर्व रा.संभाजी कॉलनी, औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मनिषा (वय २५,काल्पनिक नाव) हीचे औरंगाबाद येथील पियुष हरिदास बावस्कर याच्याशी ९ जानेवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल (लेवा भवन) येथे विवाह झाला होता. विवाहाच्या पूर्वी लग्न जुळविणाऱ्या लोकांनी तसेच पियुषच्या कुटुंबियांनी तो श्री साई पॉलिटेक्नीक कॉलेज ऑफ इंजिनियरींग औरंगाबाद या संस्थेत कायम स्वरुपी प्राध्यापक म्हणून नोकरीला असल्याचे सांगितले होते. लग्न झाल्यानंतर मनिषा सासरी गेली असता दोन दिवसानंतर पती दारु पिऊन आला व अश्लिल भाषेत शिवीगाळ करु लागला. यानंतर रोजच हा प्रकार सुरु असताना काही इतर महिला व मुलींशी त्याचे संबंध असल्याचे जाणवले, मोबाईलमध्ये रेकॉर्डींग तसेच व्हाटसअॅप झालेला संवाद दिसून आली. हा प्रकार सासु-सासऱ्यांना सांगितला असता त्यांनी मदत करण्याऐवजी धमकीच दिली. हा प्रकार वाढतच गेला. मद्याच्या नशेत पतीकडून जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य होत असल्याने पत्नीने हा प्रकार फोन करुन आई, वडिलांना सांगून घ्यायला औरंगाबाद येथे बोलावून घेतले. माहेरी येतान अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
संस्थेच्या चेअरमनकडून दिशाभूल
दरम्यान, लग्न जमविण्याआधी मुलीच्या वडिलांनी पियुष खरच कायमस्वरुपी नोकरीला आहे का? याची चौकशी करण्यासाठी संस्थेच्या चेअरमनशी भेट घेतली असता, त्यांनी कायमस्वरुपी नोकरीला असल्याचे सांगितले होते. लग्नानंतर मुलगी, तिचा पती व कुटुंब चेअरमनकडे जेवणाला गेले असता तेथे त्यांच्या बोलण्यातच जाणवले की पियुष कायम नोकरीला नाही व त्याला साडे सहा लाखाचे पॅकेज पण नाही. लग्नाआधी चेअरमननेही दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, लग्न जमविण्यासाठी पियुष माझ्या संस्थेत नोकरीला असल्याचे खोटे सांगणाऱ्या चेअरमनलाही या गुन्ह्यात आरोपी केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
साखरपुड्याचे फोटो आढळले
दरम्यान, मनिषा हिने कागदपत्रांची पडताळणी केली असता त्याच्या जन्मतारखेत घोळ दिसून आला त्याशिवाय आधी एका मुलीसोबत झालेल्या साखरपुड्याचे फोटोही दिसून आले. माहेरी आल्यानंतर एका महिलेने फोन करुन तू त्याची लग्नाची तिसरी बायको आहे, असे सांगितले. त्याने अनेकांना असेच फसविल्याची माहिती या महिलेने दिली. पियुष याने लग्नाआधी बँकेतून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते, ते कर्ज फेडण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावे म्हणून देखील मनिषाला मारहाण करण्यात येत होती,असे फिर्यादीत नमूद आहे.