‘विकास मॉडेल’च्या अभ्यासासाठी २० पालिकांचा उज्जैन, इंदूर दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 06:15 PM2023-08-30T18:15:42+5:302023-08-30T18:18:42+5:30
घनकचरा व्यवस्थापन, नागरी सुविधांसह प्रणालींचा केला अभ्यास
जळगाव : जिल्ह्यातील २० नगरपालिका, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या अधिकाऱ्यांनी इंदूर आणि उज्जैन महापालिका क्षेत्रांना भेटी देत तिथल्या घनकचरा व्यवस्थापन व नागरी सुविधांचा अभ्यास केला. या दोन्ही ‘मॉडेल’ ठरलेल्या महापालिकांच्या धर्तीवर जिल्ह्यात विकास साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, तसेच लोकप्रतिनिधींनी या दोन्ही महापालिकांचा अभ्यास करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २० पालिकांच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला अभ्यास दौऱ्यावर पाठविले होते.
सर्वच प्रणालींचा अभ्यास
नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरी प्रशासनात लोकसहभाग वाढवण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी प्रशिक्षणासह अभ्यास दौरा उजवा ठरला आहे. उगमस्थानी कचऱ्याचे पृथक्करण सुनिश्चित करण्यासाठी वर्तणुकीतील बदल घडवून आणण्याच्या पद्धती त्यांना समोर आल्या. त्यांनी प्रत्यक्ष कालावधी जपण्यासाठी ‘ऑपरेशनल’ कार्यक्षमता आणण्यासाठी सर्वच प्रणालींचा अभ्यास केला. त्यांनी महसूल निर्मिती मॉडेल्स आणि पुनर्प्राप्त केलेल्या कचऱ्यापासून मालमत्ता तयार करण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. त्यानुसार शहरे कचऱ्यापासून वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र बनू शकतात, असा विश्वास या शिष्टमंडळाने व्यक्त केला. तर इंदूर आणि उज्जैन महापालिकेच्या प्रशासनाने जळगावच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे आभारही मानले.