धक्कादायक : मुख्यमंत्र्यांना जळगाव आर.टी.ओ.कडून ट्रॅक्टरचा परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:30 PM2018-07-31T12:30:03+5:302018-07-31T15:01:38+5:30
देवेंद्र फडणवीस हे जामनेरचे तर नितीन गडकरी कोथळीचे रहिवासी
विलास बारी
जळगाव : पैसे दिल्यानंतर आरटीओ कार्यालयात कोणतीही कागदपत्रे तयार होतात असा प्रकार जळगाव आर.टी. ओ.कार्यालयात उघड झाला आहे. या कार्यालयातून चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने २००४ मध्ये ट्रॅक्टरचा परवाना तयार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
दलालांनी (मध्यस्थ) पोखरलेल्या आर.टी.ओ.कार्यालयात पैसे दिल्यानंतर कोणतीही कागदपत्रे सहज तयार होत असल्याचा अनुभव अनेकांना आहे. तसेच काहीसे धक्कादायक कागदपत्रे समोर आले आहेत.
या कार्यालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने वाहन चालविण्याचा परवाना तयार करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही दलाल हे नियम आणि निकषांची अनेक वर्षांपासून वाट लावत आहे.
काही वर्षांपूर्वी बनावट आधार कार्डच्या साहाय्याने सुरत येथील काही जणांना परवाना देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तत्कालिन अधिकाऱ्यांनी ते वाहन परवाने रद्द केले होते. त्यातच आता मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांना या कार्यालयाने अवजड वाहनासह ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना वितरीत केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून कार्यालयातील कागदपत्रे किती सुरक्षित आहेत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांची बनावट सही व शिक्षण पदवीपर्यंत...
सुरुवातीच्या काळात आर.टी.ओ. कार्यालयामार्फत पुस्तक स्वरुपात वाहन चालविण्याच्या परवान्याचे वितरण करण्यात आले आहे. मात्र हा परवाना तयार करीत असताना नियमांची पायमल्ली होत आहे. तसाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर वाहन परवाना क्रमांक २२३३/२००४ हा तयार करण्यात आला आहे. या परवान्यावर मुख्यमंत्र्यांची बनावट सही तयार केली आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता बजरंगपुरा, जामनेर हा दाखविला आहे. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत तर रक्तगट ए-पॉझिटीव्ह दर्शविलेला आहे.
२००४ मध्ये काढलेला परवाना २०१८ मध्ये झाला उघड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव आर.टी.ओ.ने २०२४ पर्यंत वाहन परवाना दिला आहे. त्यात दुचाकी, अवजड वाहन आणि ट्रॅक्टरचा परवाना दिला आहे. या परवान्याच्या बदल्यात १८० रुपयांचे चलान देखील फाडण्यात आलेले आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना २०१८ पर्यंतचा परवाना
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने १२३४/२००४ या क्रमांकाने वाहन चालविण्याचा परवाना तयार केला आहे. २०१८ पर्यंत त्यांच्या परवान्याची मुदत असून त्यांना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी दाखविण्यात आले आहे. या दोन्ही परवान्यांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा शिक्का तसेच डिजिटल सही आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने तयार केलेले बनावट वाहन परवाने २००४ मध्ये तयार झाले आहे. आता वाहन परवाना स्मार्ट कार्डच्या स्वरूपात दिला जातो. मी जून २०१६ मध्ये याठिकाणी रुजू झालो आहे. वाहन परवाना क्रमांक २२३३/२००४ व १२३४/२००४ हे दुसºया व्यक्तींच्या नावाने देण्यात आलेले आहेत. हा परवाना कार्यालयातून चोरी झाला असावा किंवा बनावट प्रिंट केला असावा. संपूर्ण रेकॉर्ड शोधून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच संबधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,