पाचोरा तहसील आवारातून ट्रॅक्टरचे पार्ट चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 09:59 PM2019-12-09T21:59:51+5:302019-12-09T21:59:59+5:30
खडकदेवळा, ता.पाचोरा : पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर जप्त करुन तहसीलदारांच्या दालना समोरच ठेवण्यात आले ...
खडकदेवळा, ता.पाचोरा : पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर जप्त करुन तहसीलदारांच्या दालना समोरच ठेवण्यात आले आहेत. त्यातील अनेक ट्रॅक्टरचे टायर व स्पेअर पार्ट बोनेट, बॅटरी आदी चोरी गेल्याचे निदर्शनास आले आहे. याकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
तहसील परिसरातील या घटनेमुळे आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोपीस आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हाकेच्या अंतरावर पाचोरा पोलिस स्टेशन असून सुध्दा या ठिकाणी चोरी होते. हा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकदा शासकीय जप्तीत जमा केलेल्या सामानाची पूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालयाची असते. जप्त केलेल्या ट्रॅक्टर मालकांनी जर जप्त ट्रॅक्टरची चाके, बोनेट, बॅटरी व काही पार्ट चोरीला गेलेले असल्याची अर्जाद्वारे मागणी केली तर याची भरपाई कोण देणार? हा प्रश्न समोर येत आहे.
याकडे तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी केली आहे.