व्यापाऱ्यांनी व्यवसाय थांबविला हॉकर्सने मात्र दुकाने थाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:40 PM2020-07-29T12:40:49+5:302020-07-29T12:41:03+5:30

जळगाव : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनाने व्यापारी संकुलांमधील दुकानदारांना आॅनलाईन व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आॅनलाईनची ...

Traders halted business, but hawkers set up shop | व्यापाऱ्यांनी व्यवसाय थांबविला हॉकर्सने मात्र दुकाने थाटली

व्यापाऱ्यांनी व्यवसाय थांबविला हॉकर्सने मात्र दुकाने थाटली

googlenewsNext

जळगाव : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनाने व्यापारी संकुलांमधील दुकानदारांना आॅनलाईन व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आॅनलाईनची व्यवस्था नसल्याने आता ३१ जुलैनंतरच्या आदेशानुसारच व्यवसाय सुरु करण्याची भूमिका व्यापारीवर्गाने घेतली असताना दुसरीकडे हॉकर्सने मात्र अनधिकृतपणे व्यवसाय थाटत सोशल डिस्टन्सिंगसह सर्वच नियमांचा भंग केला आहे. मंगळवारी फुले मार्केटसह मुख्य बाजारपेठेत हॉकर्सने अक्षरश: घुसखोरी करीत दुकाने थाटल्याचे चित्र पहायला मिळाले.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील गर्दी रोखण्यास प्रशासनाला सुरुवातीपासूनच अपयश आले आहे. मनपा अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्याही यासाठी कारणीभूत आहे.
मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर लावण्यात आलेले सील उघडल्यानंतर मंगळवारी बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते.
तसेच फुले मार्केटमध्येदेखील अनधिकृत हॉकर्सने व्यवसाय सुरु केल्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. विशेष म्हणजे फुले मार्केटमधील दुकाने अजूनही उघडण्यात आलेली नाहीत. तरीही या मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

पुन्हा सुरू झाला भाजीपाला बाजार
बळीराम पेठ, सुभाष चौक भागात गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला भाजीपाला बाजार पुन्हा सुरु झाला आहे. मात्र, भाजीपाला बाजार जरी सुरु झाला असला तरी याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक असो वा विक्रेते कोणतीही खबरदारी घेताना दिसून येत नाहीत. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली.

मनपाकडून मोहिमेच्या हालचाली
महापालिकेकडून दररोज कारवाई होत असतानाही हॉकर्स व अनेक व्यावसायिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. त्यामुळे बुधवारपासून महापालिका प्रशासन आता जोरदार कारवाईच्या तयारीत आहे. याबाबत मनपा अतिक्रमण विभागाला अतिरीक्त कर्मचारी पुरविण्यात येणार असून काही मक्तेदाराकडील कर्मचारीही घेण्यात येणार आहे.

Web Title: Traders halted business, but hawkers set up shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.