चाळीसगावला स्टेशन रोडवरील व्यापारी धुळीने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:32 PM2020-11-26T16:32:52+5:302020-11-26T16:34:34+5:30
रेल्वे स्टेशनरोडवरील सिग्नल पाॕईंट ते तहसील कार्यालयापर्यंतचे सर्व व्यापारी धुळीने त्रस्त झाले आहेत.
चाळीसगाव : रेल्वे स्टेशनरोडवरील सिग्नल पाॕईंट ते तहसील कार्यालयापर्यंतचे सर्व व्यापारी धुळीने त्रस्त झाले आहेत. गुरुवारी थेट व्यापाऱ्यांनी नगरपालिकेत धडक देऊन मुख्याधिका-यांनी होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. धुळीमुळे होणारे नुकसान आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामातून सोडवणूक करावी, अशी मागणी करणारे निवेदनही दिले. निवेदनाच्या प्रती खासदार व आमदारांनाही देण्यात आल्या.
सिग्नल पॉईंट ते तहसील कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येने व्यापारी संकुले व दुकाने आहेत. मध्यंतरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात नगरपालिकेने माती मिश्रीत मुरुम टाकल्याने वाहनांच्या वर्दळीने या परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता डांबरी असताना खड्ड्यात माती मिश्रीत मुरुम टाकला गेला.
वाहनांच्या वर्दळीने रस्त्यावरील माती हवेत उडते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणही निर्माण झाले आहे. धुळीमुळे दुकानांमधील माल खराब होत असून काही व्यापाऱ्यांना श्वसनाचे विकार जडले आहे. न.पा.चे स्वच्छता कर्मचारी सकाळी रस्ता झाडतानाही धूळ रस्त्याच्या दूभाजकाजवळच लावतात. हीच धूळ वाहनांच्या वर्दळीने पुन्हा दिवसभर उडत असते. याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असून नागरिकही त्रस्त झाले आहे. ही समस्या निकालात काढावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
प्रीतेश कटारिया, जितेंद्र देशमुख, राहुल कारवा, आनंद बोरा, दीपक वासवानी, पंकज कोठारी, संदेश येवले यांच्यासह २० ते २५ व्यापारी उपस्थित होते.