आबाद आणि बरबाद करणाऱ्या जुगार खेळण्याची खान्देशात परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 04:07 PM2018-04-18T16:07:10+5:302018-04-18T16:07:10+5:30
अक्षय तृतीयेनिमित्त जळगावात ‘पत्तास ना डाव, अन् मामानं गाव’
विलास बारी/ आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१८ - अक्षय आनंद देणाºया अक्षय तृतीयेचा सण म्हटला म्हणजे खान्देशात आनंदाला उधाण असते. सासुरवाशिणीचा विरंगुळा, कृषी संस्कृतीचा कळवळा आणि पूर्वजांचे स्मरण ही संस्कृती आणि परंपरा खान्देशवासियांकडून यानिमित्ताने जोपासल्या जात असताना या दिवशी खान्देशातील अनेक कुटुंब आबाद आणि बरबाद करणारा पैसे लावून जुगार खेळण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरु आहे.
पत्तास ना डाव, अन् मामानं गाव
मावशीसना मान, मामीले तान
बहिनीसना हेका, पाहिजे झोका
आम्बानं जेवण, ऊना आखाजी ना सण
असे अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व खान्देशात आहे. वर्षभर सासरी काम करून उन्हाळ्याच्या दिवसात माहेरी येऊन आराम करण्यासाठी विवाहितेला नेहमी अक्षय तृतीयेची आस असते. माहेरी आल्यानंतर आपल्या जुन्या मैत्रिणींसोबत झोका खेळून गौराईचे गाणे म्हणण्यात विवाहितांची चढाओढ सुरु होते. चैत्र वैशाखांच्या उन्हामुळे जमीन भाजून निघाल्यानंतर जमिनीच्या मशागतीसाठी गावागावात सालदाराची नियुक्ती देखील याच सणाच्या निमित्ताने होत असते. घरातील पितरांचे पूजन व घागर भरून पूजन करण्याची प्रथा याच निमित्ताने अव्याहत सुरु आहे.
गल्लोगल्लीत जुगार अड्डे
चैत्र वैशाख महिना सुरु झाल्यानंतर या दिवसात शेतात फारशी कामे राहत नाहीत. खरीपाच्या हंगामासाठी साधारणपणे अक्षय तृतीयेनंतर मशागतीची कामे सुरु होता. माहेरवाशिन झोका व गौराई गीत म्हणून अक्षय आनंद घेत असतांना खान्देशात या दिवशी गल्लोगल्ली जुगाराचे अड्डे बसलेले असतात. पाच रुपयांपासून ते पाच हजारापर्यंतचा डाव या दिवशी खेळला जात असतो.
तीन पत्ती, फटका, झन्ना-मन्नावर कोट्यवधीची उलाढाल
अक्षय तृतीयेला तीन ते चार दिवस शिल्लक असताना ग्रामीण भागात जुगार अड्डे सुरु होतात. या दिवशी सर्वात जास्त प्रमाणात तीन पत्ती आणि फटका या प्रकाराला प्राधान्य दिले जाते. झटपट श्रीमंत आणि कंगाल करणाºया या दोन्ही खेळ प्रकारात खान्देशात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
जुगाराला मिळते या दिवशी प्रतिष्ठा
अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मंडप टाकून जुगार अड्डे चालविण्यात येत असतात. जुगार अड्डा चालविणारा जागा मालक हा खेळात सहभागी लोकांसाठी जेवणापासून ते दारू, गुटखा, सिगारेट, चहा यासाºयाची व्यवस्था जागेवरच करीत असतो. एरव्ही बदनाम असलेल्या जुगाराला अक्षय तृतीयेच्या दिवशी मात्र प्रतिष्ठा मिळत असते. जुगार खेळण्यात रमलेले अनेक जण हे तीन ते चार दिवस एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेले असतात.
रावाचा रंक आणि रंकाचा राव
बेभरवशाचा खेळ असलेल्या जुगारात अनेक जण या दिवशी रावाचे रंक होत असतात. तर अनेक जण रंकाचे राव देखील होत असतात. जुगारात पैसे जिंकल्यानंतर मात्र हारणाºया व्यक्तींकडून त्याला पूर्ण डाव होईपर्यंत खेळण्यासाठी आग्रह होत असतो. जास्तीच्या मोहात अनेकदा घरातील रोख रकमेसह सोने व चांदीचे दागिने तसेच मालमत्ता देखील गहाण ठेवण्याची नामुष्की अनेकांवर ओढवत असते.
प्रथा म्हणून पोलिसांचे दुर्लक्ष
वर्षानुवर्षे चालत असलेली ही जुगाराची प्रथा म्हणून पोलीस प्रशासन देखील कारवाई न करता या दिवशी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असते. तर काही ठिकाणी जुगार अड्डा चालविण्यासाठी मालकाकडून पोलिसांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जात असतो. एखाद्या कारवाईत शासकीय नोकरदार किंवा राजकीय मंडळ मिळाल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयांची वरकमाई पोलिसांना सहज यानिमित्ताने होत असते.