जळगाव काँग्रेसची अपयशाची परंपरा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:24 PM2018-08-06T14:24:05+5:302018-08-06T14:29:19+5:30
महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसची लढत ही न जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न होते. लंगड्या घोड्यासह मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी एकांगी झुंज दिली मात्र नेत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसची लढत ही न जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न होते. लंगड्या घोड्यासह मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी एकांगी झुंज दिली मात्र नेत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. गेल्या १५ वर्षांपासून सतत एकही जागा न जिंकण्याचा आगळावेगळा विक्रम काँग्रेसने प्रस्थापित केला आहे.
जिल्हा निरीक्षकांनी टेकले हात
जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी सुरुवातीला मेळावे घेत येथील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या विजयासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक पदाधिकाºयांना केले. मात्र हे आवाहन धुडकावून लावत एकाही पदाधिकाºयाने कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली नाही.पक्ष निरीक्षकांनी देखील स्थानिक पदाधिकाºयांना हात टेकले.
नियोजनाचा अभाव
काँग्रेसने सुरुवातीपासून या निवडणुकीत आपण किंगमेकर राहणार असल्याचा दावा केला. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन मात्र पदाधिकाºयांकडून झाले नाही. काँग्रेसची बुथ रचना कमकुवत असल्याने पक्षाला सपाटून मार खावा लागला. पक्षाची कोणती ताकद नसताना पोकळ आत्मविश्वास मात्र काँग्रेस पदाधिकाºयांमध्ये मतदानाच्या दिवसापर्यंत होता.
प्रदेशच्या नेत्यांनी फिरविली पाठ
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरुवातीला प्रदेशच्या नेत्यांच्या सभांचे नियोजन केले होते. नंतर मात्र निवडणुकीतील स्थितीचा अंदाज येत गेल्यानंतर प्रदेशच्या नेत्यांनी देखील जळगावकडे पाठ फिरविली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसची एकही मोठी प्रचारसभा झाली नाही.
जाकीर बागवान वगळता सर्व दीड हजाराच्या आत
काँग्रेसने १६ जागांवर उमेदवारांना उभे केले. त्यातील सर्वाधिक २ हजार ७६ मते ही जाकीर बागवान यांना मिळाले. त्यांच्या पाठोपाठ रेखा भालेराव यांना १२२६ तर भरत बाविस्कर यांना ११७१ मते मिळाली आहे. उर्वरित सर्वच उमेदवार हे तीन आकडी संख्याही गाठू शकले नाहीत.
मुस्लीम, दलित मतदार दुरावताहेत
पूर्वी मुस्लीम व दलित मतदार हे काँग्रेसचे हक्काचे मतदार मानले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस नंतर समाजवादी पार्टी आणि आता एमआयएम यांच्या जळगावातील प्रवेशामुळे हा हक्काचा मतदार काँग्रेसपासून दुरावत चालला आहे.