गितांजलीसह शालीमार एक्सप्रेस रद्दमुळे प्रवाशांची हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:05 PM2019-12-16T22:05:53+5:302019-12-16T22:06:07+5:30
गैरसोय : ईशान्य भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आंदोलन
जळगाव : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ईशान्य भारतात जोरदार आंदोलन पेटले असून, याचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. या आंदोलनामुळे गितांजली एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेस या महत्वाच्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने ईशान्य भारतात जाणाऱ्या खडगपुर, हावडा, शालिमार या ठिकाणी जाणाºया गितांजली एक्सप्रेस, शालिमार एक्सप्रेस, पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस या गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या गाड्या रद्द केल्यामुळे तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे चांगलीच गैरसोय झाली. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गितांजली एक्सप्रेस व शालिमार एक्सप्रेस याच गाड्यांना जळगाव स्टेशनवर थांबा असून, या दोन्ही गाड्यांना हजारो संख्येने प्रवासी ईशान्य भारतात जात असतात. वर्षांतील बाराही महिने या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असते. ईशान्य भारतात जाण्यासाठी जळगावातील प्रवाशांकरिता गितांजली व शालिमार एक्सप्रेस या दोनच गाड्या आहेत.
ताप्तीगंगा सहा तास लेट
उत्तर भारतात सुरु असलेल्या तांत्रिक कामामुळे रविवारी भुसावळ विभागातुन सुरतकडे जाणारी ताप्तीगंगा एक्सप्रेस ६ तास विलंबाने धावली. या गाडीची जळगाव स्थानकावर येण्याची वेळ दुपारी साडेबाराची असतांना ही गाडी सायंकाळी साडेसहा वाजता जळगावला आली. गाडी येईपर्यंत प्रवाशांना स्टेशनावरच गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.