कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:50 PM2020-11-22T14:50:34+5:302020-11-22T14:53:12+5:30
औरंगाबाद मागार्वर कन्नड घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : औरंगाबाद मागार्वर कन्नड घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.त्यामुळे सुमारे पाचशे पेक्षा अधिक वाहने घाटात अडकून पडली होती. घाटाच्या पायथ्यापासून थेट वरपर्यंत आठ कि.मी. पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात अवजड वाहनांसह इतर छोटी-मोठी वाहनाचा समावेश होता.
अडकून पडलेल्या वाहनांमध्ये अवजड वाहतुकीबरोबरच छोट्या वाहनांचाही समावेश असल्याने प्रवास करणारे अनेकजण हवालदिल झाले होते. एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा तास याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
घाटात एवढी वाहतूक यंत्रणा ठप्प होवूनसुद्धा महामार्गावरील पोलीस वेळीच येवू शकले नाही. रात्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वाहनधारक पुढे आल्याने त्यांची अक्षरशः दमछाक झाली. घाटातील वाहतूक जाममुळे प्रवाशांना विनाकारण नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -२११ वरील कन्नड घाट आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांसह इतर वाहने या घाटातून जात असतात.
पावसामुळे कन्नड घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. घाटात यु आकाराची अनेक वळणे आहेत. शुक्रवारी सायंकाळी घाटातील वळणावर अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.