मागोवा : प्लॅस्टिक बंदीने जळगावात उद्योगांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:17 PM2018-12-30T12:17:36+5:302018-12-30T12:18:19+5:30

सात उद्योग बंद

Traffic: Crisis on Jalgaon industries by plastic ban | मागोवा : प्लॅस्टिक बंदीने जळगावात उद्योगांवर संकट

मागोवा : प्लॅस्टिक बंदीने जळगावात उद्योगांवर संकट

Next

- विजयकुमार सैतवाल
जळगाव : राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे प्लॅस्टिक ग्लास तयार करणारे जळगाव शहरातील सात उद्योग बंद पडून अनेकांचा रोजगार बुडण्यासह मोठ्या गुंतवणुकीवर पाणी सोडण्याची वेळ २०१८ या वर्षात उद्योजकांवर आली. पर्यावरणाच्या दृष्टीने या निर्णयाचे स्वागत होत असले तरी सरकार प्लॅस्टिक कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरल्याने प्लॅस्टिक उद्योजक, व्यावसायिकांकडून या बाबत प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.
सात उद्योग बंद
प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या तसेच चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे डबे, चमचे, पिशवी, फरसाण-नमकीन यांची आवरणे यावर राज्यात २३ जून पासून बंदी लागू झाली. जळगावात प्लॅस्टिक उद्योग मोठा असून या बंदीत येणारे प्लॅस्टिक ग्लासचे उत्पादन करणारे जळगावातील सात उद्योग बंद करण्याची वेळ जळगावातील उद्योजकांवर आली.
विक्री पूर्णपणे बंद
जळगावात जवळपास २२ प्लॅस्टिक वस्तू विक्री करणारे व्यापारी आहे. त्यांनी बंदी असलेल्या ज्या ज्या वस्तू माध्यमांमार्फत समजल्या त्या विक्री करणे बंद केले. बंदीच्या अंमलबजावणी पूर्वी तीन महिने अगोदर सरकारने परिपत्रक काढल्याने व्यापाºयांनी माल घेणे बंद केले होते व शिल्लक माल विक्री करीत होते. असे असले तरी अनेकांकडे बंदीनंतरही माल शिल्लक राहिल्याने कोट्यवधीचे नुकसान व्यापाºयांना सहन करावे लागले.
बेरोजगारीची कुºहाड
जळगावात प्लॅस्टिकचे ग्लास तयार करणाºया सात कंपन्यांमधून देशभरात हे ग्लास पाठविले जात होते. प्रत्येक कंपनीमध्ये ३० ते ३५ कामगार होते. या उद्योगावर अवलंबून असणारे वाहतूकदार तसेच इतर पूरक व्यावसायिक अशा शेकडो जणांवर बेरोजगारीची कुºहाड या बंदीमुळे ओढावली.
कोट्यवधीचे कर्ज
प्लॅस्टिक ग्लास तयार करणाºया प्रत्येक कंपनीमध्ये दोन ते अडीच कोटींची गुंतवणूक संबंधिक उद्योजकाने केली. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने त्यावर पाणी सोडण्याची वेळ उद्योजकांवर आली. सोबतच सरकारने मार्चमध्ये या बाबत परिपत्रक काढले व लगेत जून महिन्यात बंदी लागू केली. त्यामुळे एवढ्या कमी दिवसात बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज फेडणे शक्य नसल्याने उद्योजक हादरुन गेले.
ई -वे बिल प्रणाली लागू
देशभरात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी ई -वे बिल ही प्रणाली लागू करण्यात आली. त्यानुसार १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या सोबतच २५ मे पासून राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही ई-वे बिल अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात आला. एका ठिकाणाहून कोणताही माल नेताना माल पोहचविण्याचे ठिकाण ५० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्यासाठी ई-वे बिल सक्तीचे करण्यात आले. यामध्ये ५० हजारापेक्षा जास्त दराचा माल असेल तरच ई -वे बिल लागणार आहे. नवीन अद्यादेशानुसार एका दिवसात १०० कि.मी. अंतर पार करणे सक्तीचे केले. २०० कि.मी. अंतर असेल तर दोन दिवस अशा पद्धतीने प्रति दिवस १०० कि.मी. अंतर कापणे ठरवून देण्यात आले. यामध्ये काही कारणास्तव अडथळे आले तर त्याबाबत चालकाने जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार असून कार्यालय त्यास वेळ वाढवून देऊ शकते, अशी सवलतही यामध्ये देण्यात आली.
डाळींच्या उत्पादनात घट
कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिलला बसून दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले. त्यात विदेशातून होणारी कच्च्या मालाची आवकही बंद असल्याने डाळ उत्पादनावर मोठा परिणाम झाला. कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला. उडीद, मुगाला शेवटच्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालाची चणचण भासू लागली.
उत्पादन ७५ टक्क्यांवर
देशातील डाळ उत्पादनात जळगावचा मोठा वाटा असून येथील डाळ देशातील विविध भागासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली. ५ हजार क्विंटलपैकी ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होऊ लागली.
सोन्याची ३२ हजारावर झेप
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची होणारी घसरण याचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत जाऊन सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन आॅक्टोबर महिन्यात सोन्याने ३२ हजाराच्यावर झेप घेतली. या सोबतच चांदीच्या भावातही याच महिन्यात एक हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली. जुलै व आॅगस्ट महिन्याच्यासुरुवातीला सोन्यात घसरण होऊन ते ३० हजार रुपयांच्या खाली गेले होते. मात्र सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील सोने बाजारात उलाढाल वाढल्याने सोन्याचे भाव पुन्हा वाढले. त्यासोबतच तेव्हापासून अमेरिकन डॉलरचे दर वाढतच गेल्याने सोने ३२ हजारावर पोहचले. तत्पूर्वी एप्रिल महिन्यात सोने ३१ हजार ९०० रुपयांपर्यंत पोहचले होते. त्या वेळीही लग्न सराईमुळे सोने ३२ हजारावर पोहचेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही.
दसरा दिवाळीच्या काळातही सोन्याने मोठी मागणी वाढून सुवर्ण पेढ्या गजबजून गेल्या होत्या. वर्षाच्या अखेर डिसेंबर महिन्यात तर सोन्याच्या भावात दररोज चढ-उतार होत असून ते कधी ३१ हजाराच्या खाली जात आहे तर कधी पुन्हा ३२ हजारावर पोहचत आहे.
पेट्रोल नव्वदी पार
दररोज होणाºया इंधन दरवाढीमुळे महागाईच्या झळा वाढत गेल्याने मालवाहतुकीचे दर वाढण्यासह धान्य, भाजीपाल्याचेही भाव वधारले. सप्टेंबर महिन्यात तर पेट्रोल ९०.२० रुपये प्रती लिटरवर पोहचले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर वाढण्यासह भारतीय रुपयातील घसरण यामुळे भारतात इंधनाचे दर सातत्याने वाढत गेले व पेट्रोल ९०.२० रुपये प्रती लिटर होऊन ते नव्वदीच्यापुढे पोहचले.
मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्के वाढ
डिझेल दरवाढीमुळे मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात ही वाढ होण्यापूर्वी काही दिवसांअगोदरच झालेल्या दरवाढी झाल्याने पुन्हा लगेच दरवाढ करता आली व इंधन खर्चाचा बोझा मालवाहतूकदारांनी त्या वेळी सहन केला. मात्र त्यानंतर दुसरीही दरवाढ लागू करण्यात आली.
धान्याच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ
मालवाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने धान्याच्या किंमतीवरही अप्रत्यक्षरित्या फरक पडला. हळूहळू धान्याच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढून २२५० ते २४०० रुपयांवर असलेल्या गव्हाच्या भावात वाढ होऊन ते २४०० ते २५०० रुपयांवर पोहचले.
फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत फटाक्यांची आॅनलाइन विक्रीस नकार देण्यासह केवळ परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात, असे निर्देश दिले. सोबतच दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षासाठी फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील ठरवून दिली.
कांद्याने रडविले
कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा कांद्याचे भाव गडगडले. यामुळे कांदा उत्पादकांना कांद्याने पुन्हा एकदा रडविले. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने लाल कांद्याचे भाव केवळ २ रुपये प्रती किलोवर आले. त्यामुळे अनेक कांद्या उत्पादकांच्या हाती उत्पादन खर्चही आला नाही.

Web Title: Traffic: Crisis on Jalgaon industries by plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव