भाजीपाला विक्रेत्यांमुळे अजिंठा चौकात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:08 AM2021-05-04T04:08:07+5:302021-05-04T04:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दररोज होणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे सोमवारी सकाळी ८ वाजता अजिंठा चौक ते आर. एल. चौकादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाजीपाला मार्केटमधून लिलाव करून येणारी वाहने व मार्केटसमोरील रस्त्यालगत भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांमुळे औरंगाबाद रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक विभागाचा कोणताही कर्मचारी नसल्याने तब्बल दीड तास वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज जिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. त्यातच बाजार समिती प्रशासनाने किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीत व्यवसाय करण्यास सद्यस्थितीत बंदी घातली आहे. यामुळे अनेक विक्रेते बाजार समितीच्या बाहेरच भाजीपाल्याची विक्री करत असतात. बाहेरगावाहून येणारी वाहने व बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच भाजीपाला विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने यामुळे अजिंठा चौकादरम्यानच्या रस्त्यालगत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे महामार्गालगत होणाऱ्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला, बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरच माल वाहतूक करणारी मोठी वाहने देखील खोळंबल्याने, महामार्गालगतच्या वाहनांना देखील ये-जा करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
कामगार वर्गाला कामावर जायला झाला उशीर
शहरातील एमआयडीसी भागातील कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून ये-जा करत असतात. तसेच अनेक वाहने देखील सकाळच्या वेळेस या ठिकाणावरून जात असतात. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सगळीच वाहने या ठिकाणी खोळंबली होती. यामुळे कामगार वर्गाला देखील कामावर जाण्यास उशीर झाला. तब्बल दीड तास वाहतूक पूर्णपणे खोळंबल्याने, अजिंठा चौक ते काशिनाथ चौकापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात अनेक बेशिस्त वाहनधारकांनी शॉर्टकट काढण्याच्या नादामुळे वाहतुकीची कोंडी अधीकच वाढत गेली. त्यातच याठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी देखील नसल्याने वाहनधारकांनाच वाहतूक कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडावी लागली.
नेहमीचीच निर्माण झाली समस्या
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी व शनिवारी जिल्हाभरातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असते. या दिवशी अनेक वाहने भरून माल बाजार समितीमध्ये येत असतो. यामुळे दर सोमवारी व शनिवारी या रस्त्यालगत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यासह अनेक विक्रेते रस्त्यालगतच व्यवसाय करत असल्याने देखील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. तसेच वाहतूक कर्मचारी व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने, या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी मार्ग काढणे देखील आता कठीण होत आहे. सोमवारी सकाळी देखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी वाढतच जात असल्याने तब्बल दीड तासानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी येऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच सकाळी दहा वाजेनंतर अनेक विक्रेत्यांनीही आपला व्यवसाय गुंडाळल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होऊन, वाहनांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या ठिकाणी नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.