भुसावळात पाच तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:35 PM2018-09-05T23:35:02+5:302018-09-05T23:35:23+5:30
नियोजनाचा अभाव : वाहनधारकांसह पोलिसांची उडाली तारांबळ
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे चौकात नियोजनाअभावी बुधवारी तब्बल पाच तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली. तर वाहतूक शाखेच्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
शहरातील मामाजी टॉकीज रोडचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. हे काम आता दगडी पुलापर्यंतपर्यंत आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यात पांडुरंग टॉकीज ते बस स्टँड परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. सकाळी दहाला वर्दळीच्या वेळेस या रस्त्यावर वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती, तर याच वेळेस आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर दहाच्या सुमारास शाळा सोडण्यात आल्या.
यावल रोडवर डी.एस. हायस्कूल, सेन्ट आलायस, के.नारखेडे विद्यालय तसेच जामनेर रोडवरील म्युनिसीपल हायस्कूल, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, महाराणा प्रताप स्कूल यासह इतर असलेल्या शाळा एकाच वेळेस अचानक सुटल्या. यामुळे या रस्त्यावरून एकच गर्दी झाली.
शाळांमधील विद्यार्थी व कामावर जाणारा नोकर वर्ग त्यामुळे अचानक गर्दी झाल्याने तिन्ही बाजूस वाहतूक ठप्प झाली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस कमी असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांची अक्षरश: दमछाक झाली. दुपारी अडीच वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती. एकंदरीत, नियोजनाअभावी ही गर्दी झाली व तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली. याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो.
बसस्थानक ते पॉडुरंग टॉकीजपर्यंत वाहन रांगा
बहुतांशी वाहनधारकांनी आपला मार्ग बदलून टाकला होता. बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून पूर्वेकडे एसटी स्टॅडपर्यंत तर पश्चिमेकडे पांडुरंग टॉकीजपर्यंत एसटी बसेस, चार चाकी वाहने, रिक्षा व मोटारसायकल यांच्या रांगा लागल्या होत्या, तर हंबर्डे चौकापर्यंत दुचाकी रिक्षा व चारचाकी वाहनांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यास वाहतूक शाखेच्या पोलिसांना तब्बल पाच तास लागले. वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाले नव्हते.
अजून काही दिवस त्रास
शहरातील मामाजी टॉकीज जवळील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या एकाच रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यात शाळा सुटण्याची वेळ, नोकर व व्यापारी वर्ग कामावर जाण्याची वेळ एकच आहे. त्यामुळे काही काळाकरता वाहतुकीचा त्रास वाढला आहे. हा त्रास काही दिवस राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली