रस्ता खोदून, काम बंद ठेवल्यामुळे उद्भवतेय वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:05+5:302021-08-29T04:19:05+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, कोरोनामुळे या कामावरही ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, कोरोनामुळे या कामावरही परिणाम झाला असून, काही महिन्यांपासून संथ गतीने हे काम सुरू आहे. ठिकठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी, प्रशासनाने ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवल्यानंतर, पंधरा ते वीस दिवस उलटूनही काम सुरू करण्यात येत नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे, एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे दर दहा मिनिटाला वाहतूक कोंडी उद्भवत आहे. विशेष म्हणजे सायंकाळच्या सुमारास तर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत असल्याचे परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, जमिनीत असलेल्या पाणी पुरवठ्याचे पाईप व विविध कंपन्यांच्या केबलच्या अडथळ्यामुळे हे काम रखडले असल्याची शक्यता वाहनधारकांनी व्यक्त केली.
इन्फो:
काम बंद असतानाही महामार्ग प्रशासनाने रस्ता खोदून, या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक लावला आहे. वास्तविक दिवस-रात्र या महामार्गावरून अवजड वाहनांची व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र या कामास विलंब होत असल्याने याचा सर्वाधिक त्रास वाहनधारकांना होत असून, यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
-गोकूळ पाटील, वाहनधारक
महामार्ग प्रशासनाने काम तातडीने करावे, अन्यथा काम सुरू असल्याचा बोर्ड हटवून हा रस्ता वाहतुकीला मोकळा करावा. सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे, दररोज वाहतूक कोंडी उद्भवत असून, पादचारी नागरिकांना तर रस्त्याच्या खालूनही चालण्यासाठी जागा राहत नाही. या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
-अनिल साळुंखे, व्यावसायिक