नियोजनाअभावी चौकाचौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 01:00 PM2020-07-15T13:00:36+5:302020-07-15T13:00:57+5:30

वाहने लावण्यास जागाच नसल्याने नागरिकांचा संताप : मुख्य रस्त्यांवरच लावली वाहने

Traffic jams at intersections due to lack of planning | नियोजनाअभावी चौकाचौकात वाहतूक कोंडी

नियोजनाअभावी चौकाचौकात वाहतूक कोंडी

googlenewsNext

जळगाव : लॉकडाऊन उघडल्यानंतर मुख्य बाजारपेठ भागात नागरिकांची गर्दी होवू नये यासाठी मनपाने २८ ठिकाणचे रस्ते बंद करून मुख्य बाजारपेठ भागात ‘नो व्हेहीकल झोन’ तयार केले. मात्र, पार्किंगची व्यवस्था व कोणतेही नियोजन न केल्याने रस्त्यांवर नागरिकांनी वाहने लावल्याने चित्रा चौक, पत्रे हनुमान मंदिर परिसर व टॉवर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर आमदार सुरेश भोळे व मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी करून वाहतूक कोंडी दूर करीत नवीपेठ भागातील बंद केलेला मार्ग उघडून याठिकाणची वाहतूक सुरळीत केली.
सात दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर बाजारात गर्दी होईल या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने व मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहनांना बंदी घातली. मात्र, घाई-घाईने निर्णय घेताना या ठिकाणी येणारे नागरिक व व्यापारी आपले वाहने कोणत्या ठिकाणी उभी करतील याचा विचार न केल्याने मनपाचे ‘नो व्हेहीकल झोन’ चे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले दिसून आले. एका भागात वाहने येवू नये म्हणून मनपाने २८ रस्ते पूर्णपणे सील केले. मात्र, सील केलेल्या रस्त्यांचा बाहेरच नागरिकांनी आपली वाहने उभी करून, प्रशासनाची प्रचंड डोकेदुखी वाढवली. यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडालेली पहायला मिळाली.
आमदार, उपायुक्तांनी केली पाहणी
नवीपेठेत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यानंतर याठिकाणी नागरिकांकडून आमदार सुरेश भोळे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानंतर काही वेळात अमदार सुरेश भोळे व मनपा उपायुक्त संतोष वाहुळे वाहतुक शाखेचे उपनिरिक्षक दिलिप पाटील यांनी नवीपेठेत जावून प्रत्यक्ष पाहणी केली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने आमदार व उपायुक्तांनीच वाहनधारकांना सूचना देत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर आमदारांच्या सूचनेनंतर नवीपेठेकडे जाणारा सील केलेला मार्ग उघडण्यात आला. यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली.

1 महापालिके ने मुख्य बाजारपेठेत येणारे २८ रस्ते पूर्णपणे बंद केले. यामध्ये टॉवर चौक ते भिलपुरा चौकादरम्यानचा ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे ब्लॉक केला. यासह या रस्त्यावर बळीराम पेठ, शनिपेठ भागाकडून येणारे रस्ते ७ रस्तेदेखील सील करण्यात आले होते.

2 टॉवर चौक ते चित्रा चौकादरम्यानचा ३०० मीटरचा रस्तादेखील मनपाने सील केले. तसेच नवीपेठेतील छोट्या-छोट्या गल्लीबोळातून थेट या रस्त्यांवर येणारे रस्तेदेखील मनपाने बंद केल्याने या ३०० मीटरच्या रस्त्यावर एकही वाहनाला प्रवेश देण्यात येत नव्हता.

3 चौबे शाळेकडे बळीराम पेठ भागाकडून येणारा रस्ता बंद करून, थेट राजकमल टॉकीज पर्यंतचा रस्ता देखील सील करण्यात आला होता. यारस्त्यालगत बोहरा गल्लीकडे, सराफ बाजारकडे जाणारे रस्ते देखील सील केल्यामुळे नागरिकांनी जुन्या जळगाव परिसरातून बोहरा गल्ली व सराफ बाजारात जावे लागले.

प्रत्येक पॉर्इंटला चार पोलीस कर्मचारी
शहरातील बाजार पेठ सील करण्यात आल्यानंतर तेथील प्रवेशाचे सर्व मार्ग अडविण्यात आले आहेत. टॉवर चौक, भील पुरा चौक, सुभाष चौक, दाणा बाजार व चित्रा चौक येथे पॉर्इंट निश्चित करण्यात आले असून प्रत्येक पॉर्इंट चार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी दिली. दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आलेली आहे. त्यासाठी ३० कर्मचारी अतिरिक्त लावण्यात आलेले आहेत.

Web Title: Traffic jams at intersections due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.