विमान कंपनी विरोधात प्रवाशांची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:44 PM2019-11-26T12:44:58+5:302019-11-26T12:45:20+5:30
गैरसोय : सेवा रद्दबाबत विमान कंपनीकडून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे ; जळगावातील प्रवासी संतप्त, सततच्या प्रकारामुळे सर्वत्र नाराजी
जळगाव : अहमदाबादहून सकाळी जळगावला येणारे विमान दाट धुक्यांमुळे रद्द करण्यात आले. सायंकाळीदेखील औरंगाबादला येणारे विमान दाट धुक्यांमुळे रद्द करण्यात आले. विमान रद्द झाल्याची प्रवाशांना ऐववेळी माहिती देण्यात आली. प्रवाशांनी चौकशी केल्यावर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे जळगावतील संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रू जेट या विमान कंपनीविरोधात अहमदाबाद विमानतळ पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
जळगावातील प्रवासी तक्रारदार डॉ. नरेंद्र गुजराथी, त्यांच्या पत्नी प्रीती गुजराथी व इतर प्रवाशांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते २३ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथून सकाळी ९ च्या विमानाने जळगावला येणार होेते. त्यानुसार ते वेळेवरच अहमदाबाद विमानतळावर आले. विमानाची वेळ झाल्यानंतर प्रवाशांनी विमान कंपनीकडे चौकशी केली असता तेव्हा कोणतीच माहिती देण्यात आली नाही, मात्र तासाभराने या प्रवाशांना दाट धुक्यांमुळे विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. ऐनवेळी ही माहिती दिल्याने प्रवाशांनी नाराजी व संताप व्यक्त केला.
यावेळी विमान कंपनीने या प्रवाशांना सायंकाळच्या अहमदाबाद ते औरंगाबाद या विमानाने जळगावच्या प्रवाशांना औरंगाबाद पर्यंत सोडणार असल्याचे सांगितले. त्यानुसार हे प्रवासी विमान तळावरच थांबून होते. मात्र, सायंकाळी ५ वाजता या प्रवाशांना पुन्हा दाट धुक्यांमुळे औरंगाबादची सेवादेखील रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशी संतप्त झाले. यावेळी प्रवाशांनी काहीही करुन, आम्हाला जळगाव किंवा औरंगाबादला सोडण्याची मागणी केली. मात्र, विमान कंपनीने प्रवाशांची कुठलीही मागणी न ऐकता या प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
अन् प्रवाशांनी गाठले पोलिस स्टेशन
सकाळची व सायंकाळचे विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी थेट अहमदाबाद विमानतळ पोलीस स्टेशनात धाव घेतली. विमान कंपनीकडून सेवा रद्दबाबत ऐनवेळी माहिती देण्यात आल्याने गैरसोय झाल्याची तक्रार केली. विमान कंपनीने समाधानकारक उत्तरे न दिल्याने झालेल्या मानसिक त्रासाची विमान कंपनीविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, सायंकाळचीदेखील सेवा रद्द झाल्याने जळगावातील प्रवासी अहमदाबादहून हावडा एक्सप्रेसने सकाळी जळगावला आल्याचे तक्रारदार डॉ. नरेंद्र गुजराथी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.