जळगावात वाहतूक पोलिसांकडूनच वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:10 AM2018-09-13T00:10:14+5:302018-09-13T00:11:17+5:30
कॉँग्रेस भवनजवळील प्रकार
जळगाव : बेशिस्त वाहनांवर कारवाई करतांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका कारला जॅमर लावले, मात्र नंतर त्यांनाच हे जॅमर उघडता न आल्याने ३० मिनिटे वाहतुकीची कोंडी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनजवळील मुख्य रस्त्यावर घडली.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध पावले उचलले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल अशा स्थितीत वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी वाहतूक शाखेचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले असून हे पथक शहरातील विविध रस्त्यांवर दिवसभर कारवाई करीत आहे. बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनजवळ (क्र.एम.एच १९ ए.एक्स ३६९) क्रमांकाची कार रस्त्यात उभी होती. यावेळी गस्तीवर असलेल्या वाहतूक शोखेच्या पथकाने या कारच्या टायरला जॅमर लावले. थोड्याच वेळात कार चालक कारजवळ आल्यानंतर पुन्हा जॅमर काढावे लागणार होते. दरम्यान लावलेले जॅमर काढण्यास अडचणी येत असल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान जॅमर निघेपर्यंत हे वाहन रस्त्यावरच उभे असल्याने टॉवर चौकाकडून चित्रा चौकाकडे जाणाºया वाहनांचा मोठा खोळंबा झाला. यामुळे तब्बल ३० मिनिटे वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर झाली होती.