जळगाव जिल्ह्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून गावठी पिस्तुलची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:06 PM2017-12-03T21:06:01+5:302017-12-03T21:08:59+5:30
मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातून गावठी पिस्तुलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पोलिसांनी पाच वर्षात गुन्हेगारांकडून ६४ पिस्तुल व १२१ राऊंड पकडले आहेत. त्यात ५७ गुन्हे दाखल करुन ११३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पिस्तुल हे स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहेत.पोलिसांच्या रेकॉर्डवरील ही आकडेवारी असली प्रत्यक्षात पिस्तुलचा हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुनील पाटील
लोकमत आॅनलाईन
जळगाव दि,३ : मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातून गावठी पिस्तुलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पोलिसांनी पाच वर्षात गुन्हेगारांकडून ६४ पिस्तुल व १२१ राऊंड पकडले आहेत. त्यात ५७ गुन्हे दाखल करुन ११३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पिस्तुल हे स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहेत.पोलिसांच्या रेकॉर्डवरील ही आकडेवारी असली प्रत्यक्षात पिस्तुलचा हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी पकडलेले हे सर्व पिस्तुल दरोडा, घरफोडी व रस्ता लुट प्रकरणातील रेकॉर्डवर असलेल्या आरोपींकडेच आढळून आले आहेत.घटना घडल्यानंतर किंवा घटनेच्या आधीही हे पिस्तुल पकडण्यात आलेले आहेत. २०१५ व २०१६ या दोन वर्षात सर्वाधिक ४० पिस्तुल पोलिसांनी पकडले आहेत. हे सर्व पिस्तुल मध्यप्रदेशातील उमर्टी या खेडेगावातून आलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे तर भुसावळ येथे गेल्या आठवड्यात पकडण्यात आलेले एक पिस्तुल हे उमर्टी बनावटीचे नाही. उत्तर प्रदेशात अशा पिस्तुलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने हे पिस्तुल तेथूनच रेल्वे मार्गाने भुसावळात आल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
दहा हजारापासून पिस्तुल उपलब्ध
उमर्टी येथे तयार झालेले पिस्तुल हे दहा हजारापासून ते २० हजारापर्यंत मिळतात. उत्तर प्रदेशातील पिस्तुलचे दर हे अधिक आहेत.गुन्हेगारांमार्फतच हे पिस्तुल मिळतात. चोपडा भागातील सातपुडा जंगलाला लागून असलेले उमर्टी हे गाव मध्य प्रदेशात येते, त्यामुळे जळगाव पोलिसांना तेथे जाण्यासाठी मर्यादा आहेत. या गावात तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचेही प्रसंग आहेत. त्यामुळे येथे जातांना जळगाव पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेतली आहे.
गुन्हेगारीसाठी होतोय वापर
पोलिसांनी पकडलेल्या या गावठी पिस्तुलचा वापर रस्ता लुट, खून, दरोडा या सारख्या गुन्ह्यात झालेला आहे. एक पिस्तुल तर पोलिसानेच उमर्टी येथून आणल्याचे निष्पन्न झाले होते. या पोलिसाला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. भुसावळ, चोपडा व जळगाव या ठिकाणी सर्वाधिक पिस्तुल आढळून आलेले आहेत.
असे आहेत वर्षनिहाय पकडलेले पिस्तुल
वर्ष पिस्तुल राऊंड गुन्हे आरोपी
२०१३ ०८ ११ ०९ २२
२०१४ ०४ ०२ ०४ ०५
२०१५ २० ६६ १६ ३१
२०१६ २० २८ १४ ३३
२०१७ १२ १४ १४ २२
एकुण ६४ १२१ ५७ ११३