दिवसभरात ५० वेळा रेल्वे गेट होते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:17 PM2019-11-25T22:17:28+5:302019-11-25T22:17:41+5:30

पिंप्राळा रेल्वे गेट : दर दहा मिनिटाला गेट बंद होते, जळगावकर अनेक वर्षांपासून करताहेत गैरसोयीचा सामना

The train gate was closed 3 times a day | दिवसभरात ५० वेळा रेल्वे गेट होते बंद

दिवसभरात ५० वेळा रेल्वे गेट होते बंद

Next

जळगाव : दर पाच ते दहा मिनिटाला रेल्वेगाडी जात असल्यामुळे पिंप्राळा रेल्वे गेट बंद करण्यात येते. दिवसभरात ५० ते ६० वेळा हे गेट बंद होत असून, कितीही घाई असली अन् आपत्कालीन परिस्थिती असली तरी वाहनधारकांना गाडी निघेपर्यंत ताटकळतच थांबावे लागते. मात्र, कित्येक वर्षापासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे अद्याप याठिकाणी उड्डाणपुल न झाल्यामुळे वाहनधारकांकडून तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली या मार्गावर हे पिंप्राळा गेट असून, या ठिकाणाहून दररोज २४ तास गाड्यांची वर्दळ सुरु असते. शहराची निम्मेवस्ती पिंप्राळा गेटच्या त्या बाजूला ये-जा करीत असल्याने दिवस-रात्र लाखो नागरिक या गेटवरुन ये-जा करित असतात. त्यातच २४ रेल्वेगाड्या येथून जात असल्याने हे गेट जवळपास ५० ते ६०वेळा बंद करावे लागते. गाडी गेल्यानंतर गेटमनतर्फे लगेच गेट उघडण्यात येते. मात्र, दुसरी गाडी येणार असल्याने पाच ते दहा मिनिटांत पुन्हा गेट बंद करण्यात येते. गेल्या ५० ते ६० वर्षांहून अधिक काळापासून हा नित्यक्रम आहे. परंतु, अलीकडील काही वर्षांत भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढल्यामुळे, या परिसरातील रहिवाशांना दर दहा मिनिटाला होणारा गेट बंदचा त्रास नकोसा झाला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपुलाची चर्चा ऐकण्यात येत असून, अद्याप या ठिकाणी एक वीटही रचण्यात न आल्यामुळे जळगावकरांतर्फे याबाबत तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त करण्यात येत आहे.

५ किलोमीटर अंतरावर गाडी असतांना गेट होते बंद
दर पाच ते दहा मिनिटाला होणाऱ्या गेट बंदबाबत येथील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अप किंवा डाऊन मार्गावरुन गाडी येत असतांना, नियंत्रण कक्षातून सावधान राहण्याची सूचना येते. रेल्वेगाडी साधारणत: पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असतांना, लगेच गेट बंद करण्यात येते. गेट बंद केल्यावर कुठलीही आपत्कालीन परिस्थती असली तरी, रेल्वेगाडी गेल्यानंतरच गेट उगडले जाते. रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेच्या नियमानुसारच हे काम चालत असल्याचे येथील गेटवर काम करणाºया कर्मचाºयांनी सांगितले.

त्रास सहन करण्याची आम्हाला सवयच
‘लोकमत’ प्रतिनिधीने पिंप्राळा गेटवर गाडी निघण्याची वाट पाहत असलेल्या वाहनधारकांशी संवाद साधला असता, अनेकांनी कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या त्रासाचा कंटाळा आला असल्याचे सांगितले. मात्र, कायं करणार? त्रास सहन करण्याची आम्हाला सवयच झाली असल्याचेही या वाहनधारकांनी सांगितले. कितीही घाई आणि आपत्कालीन परिस्थती असली तरी, या ठिकाणी थाबांवेच लागते. कधीकाळी गेट उघडे राहिले तर बरे वाटते अन्यथा दररोज या ठिकाणी दहा मिनिटांचा वेळ वाया जातोच. वाहनधारकांचा हा त्रास नवीन नसून, अनेक वर्षांपासून आहे. मात्र, तरीदेखील मनपा प्रशासनाने वा कुठल्याही राजकीय नेत्याने याकडे लक्ष दिले नसल्याबद्दल वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: The train gate was closed 3 times a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.