भुसावळ जंक्शनवरून प्रत्येक दहा मिनिटाला धावतेय एक रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:53 PM2017-12-01T15:53:12+5:302017-12-01T16:00:52+5:30
भुसावळातून प्रतिदिन पंधरा हजार प्रवासी करतात प्रवास
पंढरीनाथ गवळी /आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१ : मध्यरेल्वेत मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ असे पाच विभाग आहेत. या पाचही विभागासह भारतीय रेल्वेत भुसावळ रेल्वे विभाग आणि स्थानकाला मोठे महत्त्व आहे. देशातील सर्वच भागात या स्थानकातून प्रवासी गाड्या धावत असतात. २४ तासात भुसावळ रेल्वे स्थानकावरुन तब्बल १३५ प्रवासी गाड्या धावतात. तर एका तासात आठ ते दहा मालगड्या येथून धावत असतात,अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
सर्वच दिशांना प्रवासी गाड्या
भुसावळ रेल्वे स्थानकावरुन प्रवाशाला देशातील कोणत्याही भागात जायचे असेल तर त्याला जाता येते. या स्थानकावरुन मुंबई (पश्चिम), (उत्तर) नागपूर (कोलकात्ता), (पूर्व), चेन्नई (दक्षिण) व पुणे, गुजरात यासह राजस्थानात जाण्यासाठी भुसावळ येथून रेल्वेची सोय आहे. येथून मेल/एक्स्प्रेससह वेगवान, अतिवेगवान शिवाय दुरांतो सारख्या गाड्या धावत असतात.
भुसावळ जंक्शनच्या आठ फलाटांवर वर्दळ
भुसावळ रेल्वे स्थानकावर सध्या एकूण आठ फलाट आहेत. त्यापैकी फलाट क्रमांक दोन सध्या तांत्रिक कारणांनी बंद आहे. सात फलाट कार्यान्वित आहेत. यातील फलाट क्रमांक चार, सहा, सात आणि आठवरुन नागपूर, चेन्नई, दिल्ली, पंजाब या भागात जाणाºया प्रवासी गाड्या सोडल्या जातात. फलाट क्रमांक एक आणि तीनवरुन मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा या भागातील प्रवाशी गाड्या धावतात. दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकावर आणखी एका फलाटाची उभारणी केली जाणार आहे. त्याला दोन वर्षापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. आठ फलाटांचे वैभव असलेल्या आणि ‘ए’ श्रेणीतील भुसावळ रेल्वे स्थानकावरुन रोज १५ हजार प्रवासी प्रवास करीत असतात.
सेंट्रल रेल्वेत अशा आहेत सिग्नल पद्धती...
सेंट्रल व अन्य रेल्वेतील सिग्नल पद्धती या प्रमाणे आहेत. यात पूर्ण ब्लॉक पद्धतीची सिग्नल यंत्रणा. दुसरी स्वयंचलित (अॅटोमॅटिक पद्धती) व तिसरी पद्धत एक गाडी पद्धती सिग्नल यंत्रणा अशा तीन पद्धतीच्या सिग्नल प्रणालीच्या सहाय्याने रेल्वे गाड्यांचे परिचालन केले जाते.
स्वंयचलित सिग्नल प्रणालीमुळे गाड्यांच्या संख्येत वाढ
भुसावळ-जळगाव दरम्यान, स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित आहे. त्यामुळे या २५ कि.मी.च्या मार्गावर एका तासात सुमारे १३ प्रवासी गाड्या व मालगाड्या चालविल्या जात आहेत. पूर्ण ब्लॉक व एक गाडी पद्धतीच्या सिग्नल प्रणालीमुळे केवळ दोनच गाड्या जाऊ व येऊ शकतात. त्यामुळे या यंत्रणेचा फायदा होत आहे.
भुसावळ-जळगाव दरम्यान २८ स्वयंचलित सिग्नल
भुसावळ-जळगाव या २५ कि.मी.अंतरासाठी २८ स्वयंचलित सिग्नल ठेवण्यात आले आहेत. यात भुसावळ-भादली सात. भादली-जळगाव-सात आणि परत जळगाव-भादली-सात व भादली-भुसावळ-सात असे २८ स्वयंचलित सिग्नल आहेत.
भुसावळ रेल्वे स्थानक मध्य रेल्वेतील एक महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावर सध्या एकूण आठ फलाट आहेत. त्यातील सात फलाट कार्यान्वित आहेत. या स्थानकावर आणखी एका फलाटाची उभारणी केली जात आहे. हे स्थानक मध्य रेल्वेतील ‘ए’ श्रेणीत मोडले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासह, स्वच्छता आणि प्रवासी गाड्या वेळेवर सोडणे या कामाना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.
- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.