जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By विजय.सैतवाल | Published: February 25, 2024 12:04 AM2024-02-25T00:04:09+5:302024-02-25T00:04:44+5:30
तीन पोलिस निरीक्षक तर एक एपीआय व सात पीएसआयचा समावेश
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या बदल्या झाल्या नाही, त्या रद्द करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यामध्ये तीन पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व सात पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पोलिस अधिकाऱ्यांना एकाच जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे झाले आहे अथवा ज्यांचा मूळ जिल्हा आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश होते. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या न झाल्याने राज्यातील काही अधिकारी ‘मॅट’मध्ये गेले. या बदल्या करताना अनेक अधिकाऱ्यांची जिल्ह्यात प्रभारी अधिकारी न ठेवता इतर शाखांमध्ये बदली करण्यात आली होती. या संदर्भात ‘लोकमत’ने २१ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने ज्या बदल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार झालेल्या नाही, त्या रद्द करण्याचे आदेश दिले होते.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची धुळे येथे, ज्ञानेश्वर जाधव यांची नाशिक ग्रामीण व शिल्पा पाटील यांचीही नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये योगिता नारखेडे यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये जळगावातील गोपाल देशमुख, रुपाली महाजन, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, गंभीर शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे, दिपाली पाटील, मसलोद्दीन शेख यांची धुळे बदली झाली आहे.
एक निरीक्षक वाढणार, एक उपनिरीक्षक कमी होणार
जिल्ह्यातून तीन पोलिस निरीक्षक जाणार असून चार नवीन निरीक्षक येणार आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण येथून राजेंद्र कुटे, अशोक पवार, पांडुरंग पवार, नंदुरबार येथून दीपक बुधवंत हे जळगाव जिल्ह्यात येणार आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये जळगाव जिल्ह्यातून एक अधिकारी जाणार असून अहमदनगर येथून महेश येसेकर हे जळगावात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये सात जण जिल्ह्यातून जाणार आहे तर सहा जण जिल्ह्यात येणार आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण येथून विजय गायकवाड, बबन पाटोळे, चंद्रकांत दवंगे, संजय विधाते, धुळे येथून कैलास दामोदर, नंदुरबार येथून प्रिया वसावे जिल्ह्यात येणार आहे.