एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:37+5:302021-07-10T04:12:37+5:30
अल्प प्रतिसाद : महामंडळातर्फे गुजरात मार्गावर बस सेवा सुरू एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच ! स्टार ८९४ जळगाव : ...
अल्प प्रतिसाद : महामंडळातर्फे गुजरात मार्गावर बस सेवा सुरू
एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच !
स्टार ८९४
जळगाव : कोरोनामुळे गेल्या महिन्यापासून बंद असलेली एसटी महामंडळाची परराज्यातील बससेवा तीन दिवसांपासून पुन्हा सुरू झाली आहे. जळगावसह जिल्हाभरातील आगारांतर्फे गुजरात राज्यातील विविध मार्गांवर बस सोडण्यात येत आहे. मात्र, या सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असून, कोरोनाच्या भीतीने प्रवाशी मात्र घरातच असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गुजरात व मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात येणाऱ्या महामंडळाच्या बसला बंदी घातली होती. तसेच यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला होता. परिणामी यामुळे राज्यातील महामंडळाची सेवाही बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच १० टक्के बससेवा सुरू होती. मात्र, कोरोनाचे संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्य शासनाने ७ जूनपासून सर्वत्र अनलॉक केल्यानंतर परराज्य वगळता महामंडळाची बससेवाही सर्व मार्गांवर सुरू झाली आहे. परंतु, परराज्यातील सेवा बंद असल्यामुळे दररोज ५ ते ७ लाखांचा फटका महामंडळाला बसत होता. अखेर गुजरात सरकारने ही बंदी उठविल्यानंतर दोन दिवसांपासून महामंडळाची गुजरात मार्गावर बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. जळगाव आगारासह जिल्ह्यातील विविध आगारांतून दररोज सुरत, वापी, सेलवास, नवसारी, बडोदा, अंकलेश्वर या मार्गांवर १० ते १२ बस जात आहेत. या सर्व बस संबंधित गावांना मुक्कामी थांबून पुन्हा सकाळी जळगावकडे रवाना होत आहेत. यामुळे परराज्यातील प्रवाशांना जळगावकडे येण्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. परंतु, सेवा सुरू होऊन तीन दिवस उलटल्यानंतरही या सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कोरोनाच्या भीतीने अनेक नागरिक प्रवास टाळत असल्यामुळे महामंडळाच्या परराज्यातील सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ही सेवा सुरू होऊन तीनच दिवस झाले असल्याने बहुतांश प्रवाशांमध्ये याची जनजागृती नाही. जसजशी प्रवाशांना या सेवेची माहिती होईल, तसातसा प्रवाशांचा या सेवेला प्रतिसाद मिळणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
- जिल्ह्यातील एकूण आगार : ११
एकूण बस : ७४०
सध्या सुरू असलेल्या बस : ५५५
रोज एकूण फेऱ्या : ५००
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बस : २४
इन्फो :
दुसऱ्या राज्यातील बससेवेला प्रवाशी मिळेनात
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली महामंडळाची परराज्यातील गुजरातची बससेवा तीन दिवसांपासून पुन्हा सुरू झाली आहे. जळगावसह जिल्ह्यातील विविध आगारांतून सुरत, बडोदा, सेलवास, नवसारी, अंकलेश्वर या मार्गावर नियमित बस जात आहेत. सध्या जिल्ह्यातील अकरा आगारांतून गुजरात मार्गावर २४ बस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार नियमित जात आहेत. मात्र, या सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. फक्त जळगाव आगारातूनच सुरत, वापी व अंकलेश्वर या ठिकाणी जणाऱ्या बसला प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे तिसऱ्या लाटेच्या भीतीने अद्यापही नागरिक घराबाहेर पडत नसल्याने याचा परिणाम महामंडळाच्या परराज्यातील सेवेवर झाला आहे.
इन्फो :
ग्रामीण भागातील बहुतांश फेऱ्या बंदच
गेल्या महिन्यात ७ जूनपासून सर्वत्र अनलॉक झाल्यानंतर महामंडळातर्फेही राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अकोला, माहूरगड यांसह गुजरात मार्गावरही बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश गावांची बससेवा अद्यापही बंदच आहे. मात्र, जी गावे महामार्गालगत आहेत, त्या गावांना बसला थांबा देण्यात येत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले, तर सध्या शाळा-महाविद्यालयात बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद आहे. शाळा सुरू झाल्यावर पुन्हा ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
धुळे, नाशिक व चाळीसगाव मार्गांवर गर्दीच-गर्दी
अनलॉकनंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे ग्रामीण भाग वगळता बहुतांश मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवाशांची गर्दी नाशिक, धुळे, चाळीसगाव व औरंगाबाद मार्गावर असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे या मार्गावर दर तासाला महामंडळातर्फे बस सोडण्यात येत आहेत. सध्या बहुतांश रेल्वे गाड्या सुरू झाल्या असल्या तरी, या गाड्यांना जनरल तिकिटाला बंदी आहे, तसेच लवकर आरक्षण मिळत नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे या मार्गावरील बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.