रेल्वेद्वारे १० हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:08 PM2020-06-17T12:08:35+5:302020-06-17T12:08:53+5:30

कोरोनातील उत्पन्न : बसने पावणेतीनशे टन मालाची वाहतूक

Transport of 10,000 tons of essential commodities by rail | रेल्वेद्वारे १० हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

रेल्वेद्वारे १० हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

Next

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत जळगावरेल्वे स्थानकावरून १० हजार टन जीवनावश्यक वस्तू बाहेरगावी रवाना करण्यात आल्या आहेत.
तसेच गेल्या पंधरा दिवसापासून एस. टी. महामंडळानेही सुरू केलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत ३०० टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने तेव्हापासून रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासी सेवा बंद ठेवून फक्त जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यात येत आहे. नागरिकांना आपले नातलग व मित्र परिवाराला कुठलीही जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी प्रत्येक राज्यात मालगाड्या व पार्सल यान सोडण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून ही सेवा देण्यात येत असून, यासाठी नागरिकांकडून अत्यल्प भाडे आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सेवेद्वारे पाठवलेली वस्तू अवघ्या काही तासातच संबधित व्यक्तीकडे रवाना होत आहे. त्यामुळे जळगाव येथून मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इतकेच नव्हे तर दिल्लीपर्यंत वस्तू पाठविण्यात आल्या असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. नागरिकांनीही या सेवेचा फायदा उचलला.

दोन महिन्यांत १० हजार टन माल रवाना
भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पार्सल यान व मालगाड्यांद्वारे जळगावहून आतापर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंचा सुमारे १० हजार टन माल विविध राज्यात रवाना करण्यात आला आहे. या वस्तूंमध्ये धान्य, औषधांचा साठा, घरातील इतर जीवनावश्यक वस्तू यासह खते, बियाणे व गेल्या आठवड्यात दिल्ली येथे केळीदेखील पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरूनदेखील काही नागरिकांच्या वस्तू रेल्वेने जळगावला आल्या. दरम्यान, या १० हजार टन मालामध्ये सर्वाधिक वाहतूक ही खते व बियाण्यांची झाल्याचेही सांगण्यात आले.

एस. टी.द्वारे दहा दिवसांत तीनशे टन मालवाहतूक
कोरोनामुळे एस. टी. महामंडळाच्या सेवेला फटका बसला असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीदेखील महामंडळाकडे पैसे नव्हते. या तोट्यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळातर्फे गेल्या आठवड्यापासून मालाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. बसचे ट्रक मध्ये रूपांतर करून व्यापारी व उद्योजकांचा माल राज्यभरात विविध ठिकाणी पोहचविण्यात येत आहे. सेवा सुरू झाल्यापासून दहा दिवसांत महामंडळाच्या ट्रकद्वारे २६८ टन मालाची वाहतूक करण्यात आली असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.

आगार निहाय मालाचे उत्पन्न
आगार उत्पन्न
१) जळगाव ९८,७९९ रूपये
२) जामनेर १३,०३९
३) रावेर १,१६,९९७
४) चोपडा ३०,०३९
५) एरंडोल २०,७३६
६) यावल ६,३००
७) अमळनेर ६,४७५
८) भुसावळ ११,११०
९) मुक्ताईनगर १५,१४५
१०) पाचोरा १०,०००
एकूण उत्पन्न ३,२८,६४०

३० जूनपर्यंत सेवा... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने तोपर्यंत मालवाहतूक सेवा सुरू राहणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जळगाव स्थानक येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Transport of 10,000 tons of essential commodities by rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.