शहरातून जाणारी वाळूची वाहतूक उपायुक्तांनी अडवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:25+5:302021-03-13T04:29:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारपासून लावण्यात आलेल्या जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील मध्यवर्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारपासून लावण्यात आलेल्या जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील मध्यवर्ती भागातून होणारी वाळूची वाहतूक मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अडवली. तसेच मालवाहतुकीला जरी परवानगी दिली असली तरी वाळूचे डंपर व ट्रॅक्टर शहरातील मध्यवर्ती भागातून न नेता बाहेरून घेऊन जाण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्या आहेत. सुभाष चौक भागात उपायुक्तांनी वाळूचे काही डंपर शुक्रवारी सकाळी ११ वाजता अडवून ठेवले होते.
जनता कर्फ्यू दरम्यान शहरात गर्दी होऊ नये. तसेच दुकाने देखील बंद ठेवण्यात यावेत यासाठी मनपा प्रशासनाचे सात पथक शहरात तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी कर्फ्यू च्या पहिल्या दिवशी शहरातील मध्यवर्ती भागात मनपाचे पथक ठाण मांडून होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुभाष चौक भागातून मोठ्या प्रमाणात वाळूच्या डंपर व इतर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आले. नेहमी ही वाहतूक शहरा बाहेरूनच सुरू असते मात्र शुक्रवारी वाळूचा डंपर थेट शहरामधूनच जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपायुक्तांनी या ठिकाणी जाऊन, डंपर थांबवून ठेवले. तसेच ही वाहतूक या भागातून करू नये अशा सूचना दिल्या. याबाबत उपायुक्तांनी गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण यांच्याशी चर्चा करून, संबंधित डंपर चालकांकडून परवाने तपासले. नंतरच ही वाहने सोडण्यात आली. तसेच शहरातून मास्क न घालताच फिरणाऱ्या काही टवाळखोरांवर देखील उपायुक्तांनी कारवाई केली आहे.
गल्लीबोळात जाऊन मनपा पथकाकडून कारवाई
मध्यवर्ती भागात जरी १०० टक्के कर्फ्यू पाहायला मिळाला तरी शहरातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचे कट्टे रंगलेले पाहायला मिळाले. मनपा प्रशासनाच्या पथकांनी कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी गल्लीबोळातील युवकांच्या या कट्ट्यांवर देखील धाड टाकली. अनेक युवक मास्क न लावताच फिरत असल्याचे आढळून आले. तसेच काही भागात अत्यावश्यक सुविधा व्यतिरिक्तही काही दुकाने उघडलेली दिसून आली. या दुकानदारांनाही महापालिकेने नोटीस बजावली आहे.